मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता जिल्ह्यात साडेचार लाखाहून अधिक अर्ज प्राप्त.

विजय शिंदे 

पुणे, दि. २३: राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील माता-भगिनीचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबनाला चालना तसेच विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता जिल्ह्यात एकूण ४ लाख ९२ हजार ८८८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

या योजनेअंतर्गत ३ जुलैपासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली असून २२ जुलैअखेर नागरी क्षेत्रात १ लाख २१ हजार २५४, आंबेगाव तालुक्यात ४८ हजार ८२ , शिरुर ४२ हजार २०२, बारामती ३९ हजार ३८२, जुन्नर ३७ हजार ९१७, खेड ३५ हजार ८७१, इंदापूर ३२ हजार ४६१, मावळ २८ हजार २७७, दौंड २६ हजार ७३८, हवेली २५ हजार ५८, पुरंदर २० हजार २४, मुळशी १४ हजार ९४५, भोर १४ हजार ९०८ आणि वेल्हा ५ हजार ५६९ व असे एकूण ४ लाख ९२ हजार ८८८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

या योजनेकरीता ’नारीशक्तीदूत‘ या मोबाईल ॲपवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. ज्या माता-भगिनीस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत, वॉर्ड, सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे. पात्र महिलांना जुलै २०२४ पासूनचा लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरीता ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून जिल्ह्यातील अधिकाधिक सर्वच पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे. तसेच शासनाच्या अधिकृत मदत केंद्रावरच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा माहिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here