महाविकास आघाडीचे सरकार येताच पहिले काम शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे..!!

विजय शिंदे 

राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे.

तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करत महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देईल, असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात यावर्षी काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागात अजून पावसाची प्रतिक्षा आहे, काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. बोगस खते बि-बियाणांचा सुळसुळाट आहे पण सरकार फक्त कारवाई करण्याच्या पोकळ घोषणा करते. पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्याला मिळत नाही तर पीक विमा कंपन्यांनाच मोठा फायदा होतो. परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील ६ महिन्यात राज्यात १७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्यातील शेतकऱ्याची आताची परिस्थिती अत्यंत बिकट असून कर्जमाफी करण्याची गरज आहे.

महायुती सरकार केवळ लाडका बिल्डर, लाडका उद्योगपती यांच्यासाठीच काम करत आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपये माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मोठ्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज भाजपा सरकारने माफ केले पण शेतकऱ्यांना देण्यासाठी भाजपा सरकारकडे पैसे नाहीत. भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती असल्याने त्यांचे कर्जमाफ केले पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ११ जून २०२४ रोजी महामहिम राज्यपाल यांची भेट घेऊन केली होती. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडेही यासंदर्भात मागणी केली पण गेंड्याच्या कातडीच्या महाभ्रष्टयुती सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतक-यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती पण केंद्र सरकारनेही शेतक-यांची घोर निराशा केली. महायुती सरकारने कर्जमाफी दिली नाही तर महाविकास आघाडीचे सरकार येताच पहिले काम शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे केले जाईल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here