विजय शिंदे
पुणे दि.२५: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एकता नगर भागातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन तेथील मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. श्री. पवार यांनी पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पूरबाधित नागरिकांना राज्य शासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ, महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, प्रशासनाला पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार नागरिकांना मदत देण्यात येईल. यापुढे पाण्याच्या प्रवाहात अडथळा येणार नाही यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. त्यासाठी प्रवाहातील झाडे आणि परिसरात टाकलेला भराव बाजूला केला जाईल. नागरिकांना अन्न व पाणी देण्याची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात येईल.
खडकवासला धरणातून नियंत्रित पद्धतीने विसर्ग सुरू करण्यात आला होता. तथापि पुणे शहर परिसरात मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस पडल्यामुळे पाण्याची निचरा योग्यप्रकारे होऊ शकला नाही आणि पूरस्थिती निर्माण झाली. धरणातील विसर्ग नियंत्रित करून पूराची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. धरणातील विसर्ग नियंत्रित करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत.
खडकवासला धरणातील विसर्ग दिवसा वाढवून रात्रीच्यावेळी समस्या येणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त नागरिकांना शासनातर्फे आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. यापुढे पूरस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरुपाची उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
उमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी पूराने प्रभावित नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना मदतीचे आश्वासन दिले. महानगरपालिका प्रशानालाही त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत चर्चा केली.