विजय शिंदे
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने जोर बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. दोन्ही आघाड्यांकडून मतदार संघाची चाचपणी देखील सुरू आहे.दरम्यान इंदापूर तालुक्यातील महायुतीतील घोळ मात्र मिटेनासा दिसत आहे. तालुक्यात विधानसभेचे पडघम वाजण्यापूर्वी राजकारण तापलं असून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून इंदापूर तालुका विकास आघाडीचा पॅटर्न समोर येताना दिसत आहे. तर त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे कार्यकर्तेही पतीत पावन संघटनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते येत्या ऑगस्ट महिन्यात इंदापूर तालुक्यात ‘इंदापूर तालुका विकास आघाडी’च्या १०० शाखा उघडणार असून गावच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून याची तयारी करण्यात आली आहे.
सलग तीन निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढलेले तत्कालीन अपक्ष (इंदापूर विकास आघाडी) माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व तत्कालीन पतीत पावन संघटनेचे प्रदीप गारटकर यांचे समर्थक मात्र “अभी” नहीं तो “कभी” नही या भूमिकेत आहेत.
प्रदीप गारटकर समर्थक म्हणून परिचित असणारे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, राजेश शिंदे, वसंत माळुंजकर, अनिल राऊत यांनी पतीत पावन संघटनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गाव भेट दौरा आहे. जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करत प्रदीप गारडकर यांना पक्षाने विधान परिषद किंवा विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी ते करत आहेत.
यावेळी विठ्ठल ननवरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले प्रदीप गारटकर यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याविरुद्ध सलग तीन(१९९५-९९-२००४) निवडणुका लढवल्या तालुक्यात मोठ्या पद्धतीने संघर्ष करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, आम्हाला राष्ट्रवादीत येऊन १८ वर्षे पूर्ण झाली आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की विधान परिषद किंवा विधानसभेची उमेदवारी मिळावी तशी आम्ही पक्षाकडे मागणी केली आहे, यावेळी आम्हाला संधी नाही मिळाली तर आम्ही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत.
१९९५ सालची पुनरावृत्ती होणार.?
१९९५ साली इंदापूरचे तत्कालीन आमदार स्वर्गीय गणपतराव पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याने नाराज झालेले हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्याच वेळी इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली, इंदापूर विधानसभेची निवडणूक तिरंगी झाल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. प्रथमच त्यांना युती सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची संधी मिळाली.
१९९९ साली काँग्रेसमध्ये फूट पडल्याने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस उदयास आली. यावेळी अपक्ष व शिवसेना भाजप युतीच्या पाठिंब्यावर असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीकडून मुरलीधर निंबाळकर यांचे आव्हान उभे राहिले. त्याचवेळी पतीत पावन संघटनेचे प्रदीप गारटकर यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केल्याने. हर्षवर्धन पाटील विरोधक मतांचे विभाजन झाले पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला.
यावेळी मात्र त्यांनी आघाडी सरकारमध्ये सहभाग घेतल्याने विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकार सोबत असल्याने हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केले. यावेळी मात्र प्रदीप गारटकर यांनी पाटील यांना शिवसेनेत जाऊन आव्हान उभे केले, यावेळी झालेल्या दुरंगी लढतील हर्षवर्धन पाटील यांनी आपली हॅट्रिक पूर्ण केली.
नंतरच्या काळात गारटकर हे राष्ट्रवादीत गेले खरे परंतु दत्तात्रय भरणे यांचे नेतृत्व उदयास आल्याने त्यांना गेली १८ वर्षात विधानसभा किंवा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली नाही. तर भाजपमध्ये जाऊनही हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्ते मात्र आपल्या जुन्या आठवणी जागवत “वही दिन अच्छे थे” म्हणत कामाला लागले आहेत.
नेते कोणतीही प्रतिक्रिया देत नसले तरी कार्यकर्ते मात्र आपला नेता विधिमंडळात जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. पाटील भरणे यांच्या लढतीत प्रदीप गारटकर यांनी उडी घेतल्यास १९९५ ची पुनरावृती होईल अशी चर्चा आहे.