विजय शिंदे
इंदापूर बायपास ते बेडसिंगे रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून कामाचे इस्टिमेट आम्हाला उपलब्ध व्हावे, तोपर्यंत काम करू नये अशी मागणी भाटनिमगाव, अवसरी -बेडसिंगे, भांडगाव व बाभूळगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
संबंधित रस्त्याचे एकूण चार किलोमीटर हे अंतर आसून यासाठी साडेआठ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी बोलताना बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे म्हणाले की हा ठेकेदार रस्त्याची साईट पट्टी भरताना मुरम अथवा खडी ऐवजी मातीचा वापर करत आहे, इंदापूर तालुक्यात अशी बरीच कामे चालू असून त्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.
यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे,अजित खबाले,मोहन गाडे, सोमनाथ पिंपरे, मनोहर भोसले, उत्तम शेंडे, दिलीप पवार,गोरख तिकोटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काम निकृष्ट झाल्यास त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो, शासनाचा निधी हा योग्य पद्धतीने वापरला जावा अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केली.
यासंदर्भात माहितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे किशोर साळुंखे यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
अन्यथा विकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन…
इंदापूर-बेडसिंगे रस्त्याचे काम निकृष्ट सुरू असून ते थांबवावे या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची भेट घेऊन माहिती दिली परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा सुप्रिया सुळे यांनाही आम्ही या कामासंदर्भात कळवले आहे, यापुढे काम इस्टिमेट प्रमाणे काम न झाल्यास इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही काम बंद पाडू.
अजित खबाले
समन्वयक विकास आघाडी इंदापूर.
चांगले काम करून घेणे ही सार्वजनिक जबाबदारी..!!
इंदापूर- बेडसिंगे रस्त्याच्या कामासंदर्भात माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला असून, इस्टिमेट प्रमाणे काम करून घेतले जाईल. या बाबतीत काहीजण विनाकारण गैरसमज पसरवत आहेत, या रस्त्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे, चांगले काम करून घेणे ही सार्वजनिक जबाबदारी असून कामात कुचराई झाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई होईल.
सतीश पांढरे
मा सदस्य पंचायत समिती इंदापूर.