विजय शिंदे
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आज एक महत्वाची घडामोड घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची जागी घेतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या पदासाठी ज्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत त्यात फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या अध्यक्षाच्या शोधासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्रातून भाजप महासचिव विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं चर्चेत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेटीमुळे असे संकेत मिळत आहेत की पक्ष नेतृत्व फडणवीसांना पक्ष संघटनेत मोठ्या पदावर नियुक्त करण्याच्या विचारात आहे. याआधी भाजप आणि आरएसएस (RSS) यांच्यात नावांबाबतीत काही मतभेद होते. यामुळे राष्ट्रीय भाजप प्रमुखांच्या नियुक्तीत उशीर झाला. पण आता फडणवीसांबाबत सहमती बनताना दिसत आहे. यामुळेच आताची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.