विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांचा उद्या दिनांक 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4.00 वाजता पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालय या ठिकाणी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश होणार आहे.
याबाबत प्रवीण माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे (sp)अध्यक्ष शरद पवार हे आमचे दैवत असून उद्या दुपारी पुणे येथे मी स्वग्रही परतणार आहे. यावेळी आगामी काळात होणाऱ्या विधानसभेसाठी आपण उमेदवार असणार का.? असा प्रश्न विचारल्यानंतर काही दिवसात स्पष्ट होईल असे उत्तर त्यांनी दिले.
या पक्षप्रवेशाने इंदापूर तालुक्यातील राजकारणाची गणिते बिघडणार आहेत. काही महिन्यातच येणाऱ्या विधानसभा 2024 या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यात तिहेरी लढत होणार हे मात्र आता प्रवीण माने यांच्या पक्षप्रवेशाने निश्चित झाले आहे.
लोकसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये प्रवीण माने यांनी अचानक सुप्रिया सुळे यांची साथ सोडत राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये पक्ष प्रवेश केला. तो पक्षप्रवेश माने यांना जबरदस्तीने करण्यास भाग पाडले होते अशा चर्चा इंदापुरात त्यावेळी रंगू लागल्या होत्या. आता मात्र प्रवीण माने यांनी यु टर्न घेऊन पुन्हा एकदा शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या बरोबरीनेच जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या पक्षप्रवेशानंतर प्रवीण माने यांना येणाऱ्या इंदापूर विधानसभा 2024 चे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
प्रवीण माने यांच्या पक्षप्रवेशासाठी कार्याध्यक्ष महारुद्र पाटील प्रयत्नशिल होते. काही दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी तसे निर्देश दिले होते, त्याचबरोबर प्रवीण माने हे इंदापूर विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील असे संकेतही पाटील यांनी दिले.