विजय शिंदे
राज्यात सध्या राजकीय यात्रांची जत्रा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीला अजून साधारण दोन महिन्यांचा अवधी आहे. त्याआधी वातावरण निर्मितीसाठी राजकीय नेते यात्रांवर निघाले आहेत.राज्यामध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीमधील सर्व नेते प्रचाराला लागले आहेत. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते दिल्लीवारी करत आहेत.
११ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा इंदापुरात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान’ यात्रा १५ ऑगस्टनंतर पश्चिम महाराष्ट्रात येणार असून इंदापूर मध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूर मध्ये महायुती मधील अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची यात्रा ८ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू झाली असून, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
१५ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राची यात्रा सुरू होईल. ती २२ ऑगस्टपर्यंत मुंबईत येईल. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी विदर्भातून सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा सलग पाच दिवसाचा दौरा आहे. यामध्ये दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, सिन्नर, अहिल्यानगरमधील कोपरगाव, चांदवड, कळवण, धुळे शहर, अमळनेर, मालेगाव (मध्य) या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. या यात्रेमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान, सर्वसामान्य जनतेशी संवाद हा महत्त्वाचा भाग असणार आहे. या यात्रेत प्रत्येक दिवशी संध्याकाळी महायुतीतील मित्रपक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. महायुतीमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे ही यामागची भूमिका आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
पहिल्या पाच दिवसानंतर सलग पाच दिवस पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी, हडपसर, मावळ, पिंपरी, खेड आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर या विधानसभा मतदारसंघात तर त्यानंतर मुंबई उपनगरमधील बांद्रा ईस्ट, कुर्ला, मानखुर्द – शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, ठाणे जिल्ह्यातील ऐरोली, मुंब्रा- कळवा, भिवंडी ईस्ट, शहापूर या मतदारसंघात नंतर विदर्भातील नागपूर वेस्ट, काटोल, सावनेर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, ब्रम्हपुरी, गडचिरोली, अहेरी या मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे.