विजय शिंदे
सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असतानाच, दुसरीकडे गावोगावच्या यात्रा, जत्रा उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात तमाशाला मागणी वाढली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या फडांना दिलासा मिळेल, अशी भावना फडमालकांनी व्यक्त केली.तमाशा कार्यक्रमासाठी करार करण्यास येणाऱ्या ग्रामस्थांच्या स्वागतासाठी पुणे-नाशिक महामार्गालगत उभारलेल्या रंगीबेरंगी आकर्षक राहुट्या लक्ष वेधून घेतात. राहुट्यांमध्ये गाद्या, तक्के, कूलर, फैन, खुर्चा आदी सुविधा असून, राहुटीच्या दर्शनी भागावर फडमालकाचा फलक लावण्यात आला आहे.
यात्रा म्हटले की, तमाशाची बारी व बैलगाडा शर्यत असे सूत्र ठरलेले. या तमाशा पंढरीत तमाशा कार्यक्रमाचे करार करण्यासाठी गावपुढारी, यात्रा उत्सव कमिटीचे पदाधिकारी यांची रेलचेल सुरू झाली आहे. विठाबाई नारायणगावकर,मालती इनामदार, मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे यांच्यासह तुकाराम खेडकर, हरिभाऊ बडे, चंद्रकांत ढवळपुरीकर, काळू-बाळू, भिका-भीमा सांगवीकर, आनंद लोकनाट्य, दत्ता महाडीक, बाळासाहेब बेल्हेकर, अंजलीराजे नाशिककर, रेखा सविता नगरकर, शांताबाई जाधव संक्रापूरकर, हौसाबाई वेळवंडकर, शकुंतला चव्हाण नगरकर आदी फडमालकांनी उभारलेल्या राहुट्या लक्ष वेधून घेत आहेत.
तमाशा फडमालक मार्च ते मे दरम्यान नारायणगावात राहुट्या उभारतात. नारायणगाव ग्रामपंचायत राहुट्या उभारण्यासाठी जागा, पाणी, वीज आदी सुविधा पुरवत असते. उपसरपंच योगेश पाटे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे यांच्या हस्ते राहुटीचे पूजन करून फडमालकांनी करार करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना काळाचा अपवाद वगळता, ही परंपरा मागील ७० वर्षांपासून अखंडित सुरू आहे. तमाशा स्टेज, तंबू उभारणे, कनात बांधणे, आचारी आदी कामांसाठी महाराष्ट्रात कामगारांचा तुटवडा आहे.त्यामुळे या कामासाठी प्रत्येक फडमालकाकडे उत्तर प्रदेशातील २० ते २५ तरुण आणलेले आहेत. लोककलेच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती संभाजी राजे जाधव यांनी बोलताना दिली.
५० तमाशा कार्यक्रमाचे करार
मार्च ते २५ मे दरम्यानचे माझे ५० तमाशा कार्यक्रमांचे करार झाले आहेत. या कालावधीतील फक्त सात तारखा रिकाम्या आहेत. यंदा कालाष्टमी (१मे) तिथीचा तमाशा करार ३ लाख ७५ हजार रुपयांना चौफुला येथील ग्रामस्थांनी यात्रेसाठी केला असल्याचे अखिल महाराष्ट्र तमाशा फड मालक परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी सांगितले.
मोठ्या फडांना मागणी जास्त
नृत्यांगणा, वग, गायक, गाड्यांचा ताफा, कलावंत संख्या, सोंगाड्या आदींची माहिती घेऊन ग्रामस्थ करार करतात, पाडवा, हनुमान जयंती, नवमी, कालाष्टमी, चैत्र पौर्णिमा आदी प्रमुख तारखांचे करार झाले आहेत. मोठ्या फडमालकांचे दीड लाख ते चार लाख रुपये, तर मध्यम फडमालकांचे एक ते दोन लाख रुपयांना करार झाले आहेत.