विजय शिंदे
राज्यातील विविध भागातील महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. पण, पुणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर अद्याप पैसे आले नाहीत.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने टाकण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील ९० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण मधील महिलांच्या खात्यावर शनिवारी (१७ ऑगस्ट) पैसे येणार आहेत. अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या ज्या महिलांनी अद्यापही अर्ज भरले नाहीत. त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरावेत.
महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणल्याने विरोधकांनी टीका केला. उच्च न्यायालयात जाऊन त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. आडकाठी निर्माण करत आहेत. टिंगलटवाळी करत आहेत. परंतु, महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पैसे काढून घेतले जाणार नाहीत. काही जण चुकीचे वक्तव्य करतात, त्याकडे दुर्लक्ष करावे. महिलांनी आशिर्वाद दिले तर पुन्हा महायुतीचे सरकार येईल. सरकार आल्यानंतर पुढील पाच वर्षे ही योजना चालू ठेवली जाईल. पाच वर्षात एका महिलेच्या खात्यात ९० हजार रुपये जमा होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.