विजय शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेसची जनन्मान यात्रा शुक्रवारी (दि. २३) इंदापूर तालुक्यात येणार आहे तालुक्यातील प्रत्येक घटकांनी या जनसन्मान यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन बुधवारी (दि. २१) करण्यात आले होते. त्यावेळी आमदार दत्तात्रयभरणे बोलत होते.
यावेळी बोलताना आ भरणे म्हणाले की, सर्व घटकांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालू वर्षाच्या बजेटमध्ये भरीव तरतूद करून मोठा न्याय दिला आहे. इंदापूर तालुक्यातील लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकर्यांना, व्यापार्यांना हे बजेट वरदान ठरले आहे.उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांचे विचार जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून घेण्यासाठी मोठ्यासंख्येने या यात्रेत सहभागी व्हावे.
विविध विकास कामांचे भूमिपूजन..
नगर विकासखात्याच्या माध्यमातून ९० कोटींच्या रस्त्यांचे, इंदापूर शहराच्या गटार योजनेचे, उजनी धरणावरून शिरसवडी पूलाच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री वीरश्री मालोजीराजे यांच्या गढी, चांद सावली बाबा यांचा दर्ग्यास भेट देऊन दर्शन घेणार आहेत.
यावेळी पक्षाचे प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.