बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजपला.? घाटगे- पाटील यांच्यानंतर भेगडे- मुळीक शरद पवारांच्या वाटेवर.?

विजय शिंदे

लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीने धोबीपछाड दिल्यानंतर महायुतीने खडबडून जागे होताना विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.जागा वाटपावरून महायुतीमध्ये घमासान सुरू असून बंडखोरीचा सर्वाधिक फटका हा भारतीय जनता पक्षाला बसणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेे यांनी जाणाऱ्याचा रस्ता कोण रोखणार.? ज्यांची जाण्याची इच्छा ते जाणारच असे म्हणत बंडखोरांचा मार्ग मोकळा केला आहे.

कोणत्या मतदारसंघात उमेदवारीवरुन संघर्ष होण्याची चिन्हे?

वडगाव शेरी, मावळ, इंदापूर, पुसद, अकोले, अमळनेर, अहेरी, उदगीर, तुमसर, अर्जुनी मोरगाव, कोपरगाव, माजलगाव, अहमदपूर, आष्टी, वाई, कागल या विधानसभा अजित पवार गटाला गेल्यास भाजपच्या नेत्यांची अडचणी होणार आहेत. पुण्यात जगदीश मुळीक, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, हर्षवर्धन पाटील नेमका कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी थेटपणे अजित पवारांच्या आमदाराचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे.हर्षवर्धन पाटील सुद्धा दुसरीकडे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणे दुरापास्त होत असल्याने ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत स्वतःच वक्तव्य केले असल्याने यापूर्वी लोकसभा निवडणुकीत केलेली मदत हर्षवर्धन पाटलांना फलदायी ठरणार .? अशी चर्चा आहे.दुसरीकडे, वडगाव शेरीतून भाजप नेते जगदीश मुळीक आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी कायम राहिल्यास कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष असेल. कोल्हापुरात चंदगडमधून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी राहिल्यास भाजपचे शिवाजीराव पाटील काय करणार? अस प्रश्न उपस्थित झाला आहे.

जागावाटपावरून घमासान होण्याची चिन्हे

दुसरीकडे, विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना असला तरी मनसेनं स्वबळाचा नारा देत उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी आतापर्यंत सात उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यातील छोटे मोठे पक्ष सुद्धा एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. यामध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू एकत्र येत तिसरा पर्याय देण्याचा विचार करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जर जागावाटपावरून ठिणगी पडल्यास आणि तिसरा सक्षम पर्याय उभा राहिला तर राज्यात चौरंगी लढत होणार आहे. याचा फटका कोणाला बसणार याचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळणार आहे. सद्यस्थितीमध्ये महायुतीने एकसंधपणे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रचाराचं रणशिंग फुंकलं असलं तरी जागावाटपावरून घमासान होण्याची चिन्हे आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here