“डिअर अहो, बाय! मी मेल्यावर.” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल.

विजय शिंदे

महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. बदलापूरची घटना ताजी आहे, त्यावरुन अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. हे सगळं असतानच छत्रपती संभाजीनगरमधील महिला डॉक्टरने पतीच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे.प्रतीक्षा प्रीतम गवारे असं आत्महत्या केलेल्या या महिला डॉक्टरचं नाव आहे. सात पानी पत्र लिहून तिने आयुष्य संपवलं आहे. या घटनेची छत्रपती संभाजी नगरमध्ये चर्चा रंगली आहे. तसंच हे पत्रही चर्चेत आहे.

प्रतीक्षा गवारे या महिला डॉक्टरने तिचा पती प्रीतम हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता असं म्हटलं आहे. तसंच हुंडा मिळावा म्हणून आणि फर्निचर मिळावं म्हणून प्रीतमने तगादा लावला होता. आता प्रतीक्षाने आयुष्य संपवल्यानंतर तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतम शंकर गवारे असं आरोपीचं नाव आहे.

प्रतिक्षा यांनी सात पानी पत्रात काय म्हटलं आहे?

डिअर अहो,

खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं तुम्ही. एका स्वावंलबी, Ambitious मुलीला Dependent बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय ( Doctor Suicide ) घेत आलात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.

माझ्या कर्तव्याला दिखावा करते असं म्हटलंत त्याचं वाईट वाटलं

सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला डॉक्टरने पतीच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं. (फोटो-फेसबुक)
मला विसरुन आनंदाने जगा असंही प्रतीक्षा यांनी म्हटलं आहे

तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर एतर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.

तुमचीच

प्रतीक्षा

अशी चिठ्ठी लिहून प्रतीक्षा गवारे यांनी आत्महत्या केली आणि आयुष्य संपवलं आहे. पतीचा रोजचा त्रास सहन होत नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here