विजय शिंदे
माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले की भाऊंची एक वैचारिक बैठक होती. भाऊंनी आयुष्यामध्ये सर्व जाती धर्माच्या सामान्य माणसांना बरोबर घेऊन जाण्याचे सामाजिक कार्य केले आहे. कर्मयोगी भाऊंनी आपल्या आयुष्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व दिले . यावेळी समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवरांनी प्रथम भाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.
सुरुवातीस श्री. नारायणदास रामदास संगीत विद्यालयाचे प्रमुख जावीर सर व त्यांच्या समवेतील विद्यार्थी, शिक्षक यांनी भजन गायले .
हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,भाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये सर्व जाती धर्माच्या सामान्य माणसांना बरोबर घेऊन जाण्याचे सामाजिक कार्य केले आहे. जेथे राजकीय विषय आहेत तेथे राजकीय विषय मांडले जेथे सामाजिक विषय आहेत तेथे सामाजिक विषय मांडले आहेत ही भाऊंच्या कर्तृत्वाची वेगळी छाप होती. 1957 च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये भाऊंनी आपली वैयक्तिक भूमिका मांडली होती नंतर झालेल्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ सहा लोक निवडून आले होते त्यात सर्वाधिक बहुमताने भाऊ निवडून आले. कर्मयोगी भाऊंनी आपल्या आयुष्यात राजकारणापेक्षा जास्त समाजकारण केले. अनेकांचे संसार प्रपंचे आयुष्य उभे केले. भाऊंनी रचनात्मक विकासाचे काम करून शाश्वत विकास केला. या इंदापूरच्या भूमीत त्यांचे नाव कायम घेतले जाईल. भाऊंनी त्यांच्या आयुष्यात विजयाचा आणि पराभवाचा कधी विचार केला नाही. भाऊंनी स्वाभिमानाने सत्याचा नेहमी विचार केला.आज जागतिक महिला दिन असून या निमित्ताने सर्व माता-भगिनींना शुभेच्छा. आज सर्व क्षेत्रात महिला भगिनी उल्लेखनीय कार्य करीत आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रीला महत्वाचे स्थान आहे. मातृदेवो भव ही आपली संस्कृती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, आमच्या कुटुंबांचे भाऊ सोबत घनिष्ठ संबंध होते. कर्मयोगी भाऊंनी मला कायम मदत केली. इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत भाऊंचे मोठे योगदान आहे. मतदारसंघ, राज्य व देशपातळीवर राजकारण यावर भाऊंसोबत नेहमी चर्चा व्हायच्या. आमचे मार्ग वेगळे होते पण आमचे संबंध खूप चांगले होते. सर्व प्रश्नांची उकल कशी करता येईल असे भाऊंचे व्यक्तिमत्त्व होते. 1992 मध्ये मी सर्वप्रथम नगराध्यक्ष झालो ते भाऊंच्या सहकार्याने झालो.
कामधेनु परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे म्हणाले की,’ कर्मयोगी म्हणजे जो कर्म करतो पण फळाची अपेक्षा ठेवत नाही असा व्यक्ती. भाऊ अखंड काम करत राहिले, समाजासाठी झिजत राहिले. १९५२ साली पहिली निवडणूक त्यांनी लढवली जवळपास सहा वेळा आमदार, मंत्री, खासदार सर्व पदे मिळाली पण वैराग्य वृत्ती चे एकमेव उदाहरण म्हणजे कर्मयोगी भाऊ. सर्व समाजाला तळागाळातील व्यक्तींना आपल्या सोबत जोडून घेण्याचे काम कर्मयोगी भाऊंनी केले.
महाशिवरात्री म्हणजे जागृत राहणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद असे किती तरी उदाहरणे देता येतील हे सर्व जागृत होते म्हणून ते युगपुरुष बनले. कर्मयोगी भाऊ सुद्धा आपल्या समाजासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या मतदारसंघासाठी जागृत होते.
कर्मयोगी भाऊंची वाट, पुढे हर्षवर्धनजी भाऊ चालवत आहेत. त्यांच्या कार्यावर कळस चढविण्याचे काम आदरणीय हर्षवर्धन भाऊ करत आहेत. हर्षवर्धन भाऊ कर्मयोगी यांचा राजकीयच नाही तर सामाजिक वारसा चालवत आहेत. भाऊची निवड सहकार क्षेत्रावरील सर्वोच्च पदावर झाली. तसेच महिला दिनानिमित्त बोलताना, जगात 204 देश आहेत स्त्रीला पुजणारा भारत हा एकमेव देश आहे असे गौरव उद्गार काढले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी भाऊंच्या कार्याची माहिती देत, स्वर्गीय भाऊ यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व क्षेत्रातील मान्यवर असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, शिवसेनेचे नेते विशाल बोंद्रे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे व इतर मान्यवर उपस्थित होते .
दरम्यान यावेळी भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. तर आभार उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी मानले.