विजय शिंदे
महाराष्ट्र राज्याच्या महत्त्वकांक्षी लाडकी बहिण योजनेचे हजारो कोटी रुपये विविध बँकांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर लाभार्थ्याला न विचारता काढून घेऊन लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैशावर दरोडे टाकल्याने संबंधित सर्व बँकांवर दरोड्याचा गुन्हा नोंदवून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला न्याय द्यावा अशी मागणी इंदापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी केली आहे.
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आपल्या राज्यातील महिला भगिनींना दरमहा पंधराशे रुपये मदत देण्याचा शासनाकडून अत्यंत धाडसी आणि योग्य निर्णय आपण घेतला, परंतु दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये आपण राज्यातील लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाकडून दिले परंतु ते अनुदान बँकेत लाभार्थ्यांच्या नावावर जमा झाल्यानंतर बँकेने ते अनुदान परस्पर कर्जामध्ये अथवा इतर बँक प्रक्रियेत वळते करून घेतले ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावेळी रक्कम जमा झाली आहे त्या लाभार्थ्याकडून खात्याचा अनेक दिवसापासून वापर केला गेला नाही तसेच खात्यावर कमी रक्कम असल्याने मोठ्या प्रमाणात बँकांनी दंडात्मक कारवाई केली आहे ही सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खातात तत्काळ जमा करावी अशी मागणी सरवदे यांनी केली आहे.
सदर योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होऊनही लाडक्या बहिणीच्या हातात दमडी आलेली नाही, त्यामुळे या योजनेचा खरा लाभ बँकांना झाला असून हजारो करोड रुपयांचा फायदा बँकांना झाला असल्याची तक्रार त्यांनी केली आहे, इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोडली तर इतर सर्व बँकांसंदर्भात तक्रारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे, संबंधित बँकांवर कारवाई करावी अन्यथा पक्षाच्या वतीने संबंधित बँकांचे बँक मॅनेजर यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.