विजय शिंदे
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरमध्ये शरद पवार यांनी भाजपला मोठा धक्का देत समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे यावेळी माळशिरस तालुक्याचे नेते उत्तम जानकर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हसन मुश्रीफ यांचा नाव न घेता जंगलाला आग लागली आणि गेंडा पळून गेला अशी टीका उत्तम जानकर यांनी या कार्यक्रमात बोलताना केली.
या कार्यक्रमात बोलताना उत्तम जानकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकी दरम्यान कागलच्या नेत्याने माझ्यावर टीका केली होती म्हणून मी एवढ्या लांबचा प्रवास करून इथपर्यंत आलोय. कोल्हापूरचा माणूस मनाने श्रीमंत आहे. या भूमीत गेल्या १० वर्षांपासून अन्याय होत आहे. जंगलाला आग लागली होती आणि समोर जाळं होता, त्या जाळ्यात माझ्या सारखे आणि समरजित घाटगे सारखे लोकं अडकले होते. जेव्हा जंगलाला आग लागली तेव्हा बिबट्या जंगल सोडून पळाला आणि त्याच्यामागे गेंडासुद्धा पळून गेला, असं म्हणत त्यांनी अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचा नाव न घेता हल्लबोल केला.
पुढे बोलताना जानकर म्हणाले की, शरद पवार यांनी २५ वर्षांपूर्वी इकडच्या नेतृत्वाला संधी दिली होती. मात्र या बहाद्दराने काय केलं? याला गोकुळचं दुध प्यायला दिलं, शरद पवारांनी या बहाद्दरासमोर काजू बदाम ठेवले तसेच गांधीनगरचं शर्टचा कापड देखील ५-५ मीटरने दिलं, याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी केडीसीसी बँकेच्या चाव्या देखील दिल्या मात्र या माणसाने पोटामध्ये सगळा पैसा भरला असा आरोप देखील त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला.
तसेच या माणसानं भ्रष्टाचार केला त्यामुळे याच्याकडे ईडी आली आणि ईडी आल्यावर तो पोटासह पळाला अशी टीका देखील यावेळी बोलताना उत्तम जानकर यांनी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केली.
तर दुसरीकडे या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी समरजित घाटगे यांच्यावर आम्ही मोठी जबाबदारी देणार असा शब्द देखील समरजित घाटगे यांच्या समर्थकांना दिला. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, समरजित घाटगे यांच्या भूमिकेचं मी स्वागतच करीत आहे, अनेक दिवसांपासून सुरु होतं, अखेर घाटगे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केलायं. आता तुम्ही सर्वांनी मिळून त्यांना विधानसभेवर पाठवा, ते फक्त आमदारच राहणार नाहीत तर त्यांच्यावर जबाबदारी देणार असल्याचा शब्दच शरद पवार यांनी कागलकरांना दिलायं.