विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर शरद पवार यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना शह देण्यासाठी शरद पवार वेगवेगळ्या रणनिती आखत आहेत.समरजित घाटगे यांना पक्षात घेऊन हसन मुश्रीफांसमोर आव्हान उभं केल्यानंतर आता शरद पवारांनी नवा डाव टाकलाय.सध्या अजित पवार गटाकडे असलेला इंदापूर विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी शरद पवार यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली असताना आंबेडकर चळवळीतील बडा नेता शरद पवारांनी आपल्या गळाला लावला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणेंसह अजितदादा गटाचं टेन्शन वाढलंय.
कोरेगाव भीमा चौकशीचे आंबेडकरी चळवळीची बाजू मांडणारे ॲड राहुल मखरे लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या ७ सप्टेंबर रोजी मखरे हे तुतारी फुंकणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात त्यांचा जंगी पक्षप्रवेश होणार आहे.
मखरे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील रहिवासी यापूर्वी त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिवपद भूषवलंय.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना आपला पाठिंबा दिला होता, त्याचबरोबर त्यांनी सक्रिय प्रचारात सहभागी होऊन आमदार भरणे यांच्या विजयात मोठा हातभार लावला, राहुल मखरे यांच्या प्रवेशामुळे इंदापूर तालुक्यात शरद पवार यांची ताकद आणखीच वाढली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.