विजय शिंदे
गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषदेवरील राज्यपालनियुक्त सदस्यांचा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत. या अनुषंगाने हालचालींना वेग आला असून येत्या १४ तारखेला या १२ आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या १२ आमदारांची नियुक्ती होणे आवश्यक असल्याने महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचे सूत्र ठरले होते. विधानपरिषदेच्या १२ जागांपैकी तिन्ही पक्षाला ४-४ जागा येणे अपेक्षित असताना भाजपने ६ जागांवर दावा केला असून उर्वरित जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी ३ जागा मिळू शकतात.