विजय शिंदे
राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या इच्छुकांमधून उमेदवार निवड आणि त्यानंतर तिकीट न मिळालेल्या आपल्या पक्षातील नाराजांबरोबरच इतर मित्र पक्षातील नाराजांचे बंड थंड करण्याची मोठी कसरत यंदाच्या निवडणुकीत करायला लागणार, असल्याचे सध्या चित्र दिसते.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोर अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात दिसतील, अशी शक्यता वर्तवण्यात येते. आणि नेमकी हीच गोष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेरले असून आगामी निवडणुकांमध्ये १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे चित्र निर्माण होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. निवडणुकांची तयारी महाविकास आघाडी आणि महायुती मधील पक्षांकडून करण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रमुख सहा पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत . त्यांच्यासोबतच छोटे-मोठे पक्ष आणि अपक्ष उमेदवारकडून देखील निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. सध्याचे चित्र पाहिलं, तर प्रत्येक पक्षामध्ये एका विधानसभा मतदारसंघासाठी तीन ते चार इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात महायुतीकडून जवळपास दहा ते बारा आणि महाविकास आघाडीतून देखील तितकेच इच्छुक उमेदवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याच बरोबर छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची संख्या वेगळी आहे. आणि हीच गोष्ट अजित पवारांना चिंतेत टाकत आहे.
नेमकं काय झालं होतं १९९५ च्या निवडणुकीत
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप (BJP) युतीविरुद्ध काँग्रेस, अशी मुख्य लढत झाली होती (राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली नव्हती). त्यावेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेसनं २८६ जागा लढवल्,या तर शिवसेना-भाजप युतीनं अनुक्रमे १६९ आणि ११६ जागा लढवल्या. तर ३१९६ अपक्ष उमेदवारांनी या निवडणूक आपलं नशीब आजमावलं. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा काँग्रेसला अवघ्या ८० जागांवर विजय मिळाला. शिवसेना-भाजप युतीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. शिवसेनेनं ७३, तर भाजपनं ६५ जागा जिंकल्या. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ४५ अपक्ष उमेदवार आमदार बनले.
अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, “येणारा विधानसभेच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. एकीकडे महाविकास आघाडी दुसरीकडे महायुती आणि आता तिसरी आघाडी तयार होण्याची चिन्हं आहेत”. संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये काहीतरी चर्चा सुरू असल्याचं कानावर येत आहे. त्याच बरोबर यंदा इतक्या लोकांना आमदार व्हायचं आहे की, कोणी थांबायला तयार नाही. तरुण नेते आहेत, त्यांना आता वाटत आहे की यंदा आपल्याला तिकीट मिळायलाच पाहिजे. जुने आहेत त्यांना आता वाटत आहे की, हे माझं शेवटचं आहे, त्यामुळे नव्याने मागायला नको. आणि मध्ये आहेत ते म्हणतात की, आम्ही मध्येच घुटमळतोय, त्यामुळे स्पर्धा तीव्र असल्याची अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी आठवत असेल की १९९५ साली देखील अशाच प्रकारे अपक्षांच्या प्रमाण वाढलं होतं. खूप जणांनी अर्ज भरले आणि त्यावेळेस ४५ अपक्ष निवडून आले. त्यावेळी एकच काँग्रेस होती. आमचे ८० लोक निवडून आले होते. आणि ११५ ते १२० च्या दरम्यान शिवसेना भाजप युतीचे आमदार निवडून आले होते. असं सांगत यंदा देखील निवडणूक लढवण्यास इच्छुकांची असलेली संख्या पाहता अशीच परिस्थिती निर्माण होते की काय ? अशी चिंता व्यक्त केली.