विजय शिंदे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे सध्या राज्याचा दौरा करत आहेत. राज्यात सर्वाधिक इनकमिंग हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहे, भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे शरद पवार गटात मोठी पोकळी आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट शऱद पवार गटाचाच राहिला आहे, त्यामुळेही त्यांच्या पक्षाकडे इच्छूंकाचा ओढा अधिक आहे. माढा विधानसभेसाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान सोलापूरमधील भाजप नेते त्यांची भेट घेणार आहेत. भाजपचे विधान परिषदेतील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा देखील यात समावेश असल्याची माहिती आहे. त्यासोबतच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत, वसंत नाना देशमुख, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले हे नेते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून इच्छूक आहेत. माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना या भेटीसाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. काही दिवसात भाजप नेत्यांचा राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश होण्याचीही शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पवार भाजपला दुसरा धक्का देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार रणजित देसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला तर तो भाजपला मोठा धक्का असेल.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने मोहिते पाटील कुटुंबियांचाय विरोध डावलून रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. त्यानंतर स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करुन मोहिते पाटील कुटुंबियांनी भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाने तो पूर्ण झाला.
लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहित पाटील यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत कुठेही दिसले नाही. त्यांना प्रचारापासून दूर ठेवले गेले होते. तेव्हापासूनच ते भाजपपासून दूरावत गेल्याचे बोलले जाते.