राज्यातील किमान २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत.? अमित शहांकडे भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी.!!

विजय शिंदे 

महायुतीतील तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात असल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या, यावरून सध्या या तीन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. कारण अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीतील घटकपक्षांचे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याचे समजते. याबाबत ‘द हिंदू’ या दैनिकाने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, राज्यातील भाजप नेत्यांच्या या मागणीला अमित शाह हे सहमती देणार का आणि या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्ष कसा प्रतिसाद देणार, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने किमान १५० जागा लढवाव्यात, यासाठी महाराष्ट्र भाजपमधील नेते आग्रही असल्याचे समजते. तर दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीच्या जागावाटपात आपल्या वाट्याला किमान ७० जागा याव्यात, अशी अपेक्षा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, हे पाहावं लागेल.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर रविवारीच मुंबईत दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत होते. पण, अजित पवार न दिसल्याने चर्चा रंगली. शेवटी शाह मुंबईहून रवाना होत असताना अजित पवार विमानतळावर पोहोचले आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह त्यांनी शाह यांच्याशी चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here