विजय शिंदे
राज्यातले काही विधानसभा मतदार संघ सध्या चर्चेत आहेत. त्या पैकी एक मतदार संघ म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदार संघ. या मतदार संघात सध्या कोण उभं राहाणार? याचे चर्चा सध्या सुरू आहे.
महायुतीमध्ये ही जागा भाजपचे हर्षवर्धन पाटील यांना जाणार की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना हे अजून ठरले नाही. मात्र महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्यांच्या पक्षातही इच्छुकांची गर्दी आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि इंदापूर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली आहे.
आज (१० सप्टेंबर) इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खा शरद पवार व खा सुप्रिया सुळे यांची भेट घेत आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मात्र महायुतीच्या घडामोडींवर शरद पवारांचे बारीक लक्ष आहे. त्यानुसार पवार निर्णय घेतील असे सांगितले जाते.
ऐन वेळी हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांकडे येतील असेही बोलले जात आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून इंदापूर विधानसभेतून महायुतीचा उमेदवार पिछाडीवर होता. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी या मतदार संघातून मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.
इंदापुरात लढत तिरंगी नको..
इंदापूरच्या उमेदवारी संदर्भात आपण योग्य निर्णय घेऊ परंतु त्या ठिकाणची लढत तिरंगी होता कामा नये असा कानमंत्र शरद पवारांनी भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांना दिला असल्याची सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे इंदापूर विधानसभा निवडणुकीत महायुती विरोधात एकास एक उमेदवार देऊन निवडणूक जिंकण्याचा शरद पवारांचा प्रयत्न राहणार असल्याचे दिसून येते.