विजय शिंदे
राज्यातले काही विधानसभा मतदार संघ सध्या चर्चेत आहेत. त्या पैकी एक मतदार संघ म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदार संघ. या मतदार संघात सध्या कोण उभं राहाणार? याचे चर्चा सध्या सुरू आहे.
तीन दिवसांच्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना भेटण्यासाठी काल संध्याकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नेतेमंडळी व कार्यकर्ते येत आहेत.आज सकाळी देखील शरद पवारांच्या गोविंद बाग या निवासी स्थानी मोठ्या प्रमाणावर इच्छुक व समर्थकांनी गर्दी केली होती.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग सुरू आहे. अशातच संभाव्य उमेदवार आपण असावे यासाठी इच्छुकांची गर्दी शरद पवारांच्या पक्षाकडे वाढली आहे.
महायुतीमध्ये ही जागा कोणाला जाणार हे अजून ठरले नाही. मात्र महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्यांच्या पक्षातही इच्छुकांची गर्दी आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि इंदापूर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली आहे.
आज (११ सप्टेंबर) इंदापूर शहरातील माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, बापू जामदार, श्रीनिवास माने, प्रमोद राऊत, अर्शद सय्यद यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खा शरद पवार यांची भेट घेत आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मात्र महायुतीच्या घडामोडींवर शरद पवारांचे बारीक लक्ष आहे. त्यानुसार पवार निर्णय घेतील असे सांगितले जाते.
ऐन वेळी हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांकडे येतील असेही बोलले जात आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून इंदापूर विधानसभेतून महायुतीचा उमेदवार पिछाडीवर होता. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी या मतदार संघातून मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.