विजय शिंदे
इंदापूरच्या शहा परिवाराने पूर्वीपासून आजरेकर फडास योगदान दिले आहे.या परंपरेची जपणूक शहा परिवाराने आजही कायम ठेवली आहे. यावर्षीही श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड, पंढरपूर – आळंदी २०५ वर्षपूर्ती, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा तसेच श्रीगुरु नामदेव आण्णा माळी वसेकर यांची ११३ वी पुण्यतिथीनिमित्त इंदापूरात आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही माहिती पुण्यतिथी उत्सव समितीचे अध्यक्ष भरतशेठ शहा यांनी दिली. इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे आजपासून (दि.१७) सुरू होणाऱ्या अखंड सप्ताह काळात किर्तन सेवा, हरीपाठ, प्रवचन सेवा होणार आहे. याकाळात विविध किर्तनकारांच्या किर्तन सेवा पार पडतील. सोमवारी (दि.२३) हभप श्रीगुरु हरिदास बोराटे आजरेकर यांचे काल्याचे किर्तन होईल.
आजरेकर फड व शहा कुटुंबाचा जुना ऋणानुबंध आहे. श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड, पंढरपूर-आळंदी या संस्थेचे ह. भ. प. नारायणदास शहा (बाप्पा) हे खजिनदार होते. ती परंपरा विद्यमान फड प्रमुख श्रीगुरू ह.भ. प. हरिदास रामभाऊ बोराटे तथा काका माऊली यांच्या रुपाने कायम राखली गेली. नारायणदास शहा बाप्पाच्या मागे त्यांचा वारकरी सांप्रदाय परंपरा जोपासणारे गोकुळदास (भाई) आणि पुढे ह.भ.प. भरतशेठ शहा यांनी इंदापूर हरीनाम साप्ताहाची धुरा सांभाळून दाखवून आजरेकर फडा प्रति असणारी श्रद्धा आणि आपुलकीचे नाते दृढ केल्याचे दिसते.
या साप्ताहामध्ये फडाचे सांप्रदायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आदी राज्यातून सहभागी झाले आहेत. त्यांची राहण्याची व इतर सोय आयोजक व उत्सव समितीचे अध्यक्ष भरत शहा यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.