खा शरद पवार २०१९ ची पुनरावृत्ती करणार.? भाजपचे विस्थापित पवारांच्या संपर्कात.!!

विजय शिंदे 

अजित पवार गट महायुतीसोबत गेल्याने भाजपमधलेच अनेक इच्छुक शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत, त्यामुळे एकीकडे भाजपवर पवारांचा पक्ष फोडल्याचा आरोप होत असला तरी आता त्याची राजकीय परतफेड म्हणून की काय पण पवारांनीच भाजपला गळती लावल्याचं बघायला मिळतंय.

अजितदादांमुळे २१ मतदारसंघातले भाजपचे इच्छुक नाराज असल्याची चर्चा आहे. याआधीच घाडगे आणि पठारे पवार गटात डेरेदाखल झाले आहेत, त्यामुळे भाजपचं आणखी कोण कोण गळाला लागणार? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २१ ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार भाजपला हरवून निवडून आलेत, पण मध्यंतरी अजित पवारांनी अख्खा पक्षच भाजपसोबत नेल्याने महायुती बळकट झालीय खरी, पण आता त्याच अजित पवारांचे आमदार भाजपातल्या इनेक इच्छुकांना विस्थापित करायला निघालेत. कारण महायुतीच्या जागावाटपात समोरासमोर फाईट झालेल्या त्या २१ जागा देखील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना जाणार हे एक उघड गुपित आहे. कदाचित म्हणून कागलचे समरजीत घाडगे वाजत गाजत पवार गटात सामील झाले देखील. इकडे पुण्यातल्या वडगाव शेरीतही माजी आमदार बापू पठारेंनी अनंत चर्तुदशीला सिल्व्हर ओक गाठून भाजपला बाय बाय केलं.

आता आपण अशाच काही संभाव्य इच्छुकांच्या यादीवर नजर टाकुयात जे की एकतर पवारांच्या वाटेवर आहेत किंवा मग पडद्याआडून पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय.

भाजपचे विस्थापित पवारांच्या संपर्कात?

इंदापूर – हर्षवर्धन पाटील, माजी मंञी

कोपरगाव- विवेक कोल्हे, भाजप इच्छुक

वाई – मदन भोसले, माजी आमदार

नंदूरबार – राजेंद्र गावित (विजय गावितांचे बंधू)

सांगली – संजय काका पाटील, माजी खासदार

याशिवाय इतरही अनेकजण असे आहेत की जे तुर्तास आपलं नाव चर्चेत येऊ देऊ इच्छित नाहीत, पण प्रसंगी कुंपणावरून उडी मारण्याची त्यांची तयारी आहे. कदाचित म्हणूनच राष्ट्रवादीवाले देखील या संभाव्य इनकमिंगवर उघडपणे बोलायला तयार नाहीत. तसं पाहिलं तर अजित पवार गटातल्या काहींनी पवारांच्या दराऱ्यापोटी घरवापसी करणं आपण एकवेळ समजू शकतो, पण २०१९ ला मेगाभरती करणाऱ्या भाजपला पवारांनी पहिल्यांदाच गळती लावल्याचं बघायला मिळतंय.

युती, आघाडी होणार म्हटलं की बंडखोरी, पक्षांतरं ही होतातच. पण त्यातही थोरल्या पवारांचा पहिला प्रेफरन्स हा अजितदादा गटापेक्षा भाजपवाल्यांना अधिक दिसतोय, कारण एकतर त्यांना लोकसभेतली सहानुभूती विधानसभेतही कायम टिकवून ठेवायची आहे, पण त्यासोबतच पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना दुखवायचं नाहीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here