विजय शिंदे
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी आज शनिवारी दि.21 सप्टेंबर रोजी बारामती मध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेत इंदापूर विधानसभेतून उमेदवारीची मागणी केली आहे. यावेळी सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने देखील उपस्थित होते.
दुसरीकडे ऐन लोकसभेत एकाकी पडलेल्या सुप्रिया सुळेंच्या मदतीला धावून आलेले पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे देखील पवार गटाकडून इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक असल्याने शरद पवार कोणाला संधी देणार याची उत्सुकता इंदापूरकरांना आहे.
प्रवीण माने म्हणाले की,बारामती मध्ये साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी सदिच्छा भेट घेतली आहे त्यासाठी बारामतीत आलो होतो.
नेहमीच साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी बारामतीत येत असतो. साहेबांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. उजनी धरणाच्या पाण्याची स्थिती चाऱ्याचा प्रश्न दुधाचे प्रश्न या संदर्भात साहेबांनी माझ्याकडून माहिती घेतली.
विधानसभेसाठी मी इच्छुक आहे. साहेबांना देखील मी सांगितलं की मी इच्छुक आहे. साहेब जो निर्णय सांगतील तो सर्वांना मान्य असेल. साहेबांनी माझी भूमिका ऐकून घेतली प्रत्येक उमेदवाराला वाटत असतं की आपल्याला उमेदवारी मिळावी.हर्षवर्धन पाटलांबाबत मला काही माहीत नाही.मी फक्त मिडियातून ऐकत आहे.
आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देण्यात यावी या संदर्भात पाठीमागे शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटले या संदर्भात प्रश्न विचारला असता माने म्हणाले की,प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला उमेदवारी मिळावी शिष्टमंडळ भेटत असतं आमचा पक्ष हेच आमचं शिष्टमंडळ आहे असं आम्ही माणतो.सर्वकाही जनतेच्या हातात आहे आमच्या हातात नाही. शरद पवार साहेब सांगतील तेच धोरण आणि तोरण असेल.