विजय शिंदे
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पितृपंधरवड्यानंतर मोठा निर्णय घेण्याचे स्पष्ट संकेत नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले आहेत.
विधानसभेची आगामी निवडणूक इंदापूरमधून लढविण्याचे सूतोवाच त्यांनी यापूर्वीच केले आहे. तसेच, त्यांनी शरद पवारांचीही दोन वेळा भेट घेतली आहे, त्यामुळे पितृपंधरवड्यानंतर हर्षवर्धन पाटील कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता राज्याला असणार आहे.
मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. अडीच वर्षांपूर्वी राज्यात भाजपसोबत अजित पवार आल्याने हर्षवर्धन पाटील यांची पुन्हा राजकीय कोंडी झाली आहे. कारण आमदार दत्तात्रय भरणे यांनी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीमध्ये विद्यमान आमदार असल्याने इंदापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. मात्र, त्यांच्या गोटातून विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत पाटील यांच्यावर प्रचंड दबाव आहे. शिवाय पाटील यांचीही विधानसभा निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा आहे, त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाने हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद दिले आहे. तसेच, नीरा भीमा आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक मदत केलेली आहे, त्यामुळे ते भाजप सोडण्याचे धाडस करतील का, हा खरा प्रश्न आहे.
दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती. तसेच, त्या अगोदरही दोघांची भेट झाली होती, त्यामुळे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय तपासून पाहत आहेत.? याचीही चर्चा सुरू आहे. खुद्द सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धनभाऊंनी निर्णय घ्यायचा आहे, असे म्हटले होते.
‘तुम्हा जनतेच्या मनात जे आहे, तोच निर्णय माझ्या विधानसभा उमेदवारीसंदर्भात आगामी निवडणुकीत घेण्यात येईल’, असे हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना सांगितले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी मागणी केली. त्यावर माजी मंत्री पाटील यांनी ‘एवढा पितृपंधरवडा जाऊ द्या’ असे स्पष्ट केले. तेवढ्यात ‘भाऊ तुम्ही तुतारी घ्या,’ अशी विनंती एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने केली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील पितृपंधरवड्यानंतर कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे.