हर्षवर्धन पाटील यांनी उरूसानिमित्ताने घेतले जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे दर्शन.

विजय शिंदे 

लुमेवाडी (ता.इंदापूर) येथील प्रसिध्द हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबां( रहे.)च्या उरूसानिमित्ताने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दर्गाहला मंगळवारी (दि.24) भेट देऊन जोधपुरी बाबांच्या मजारवरती फुलांची चादर अर्पण केली व दर्शन घेतले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मुस्लिम बांधवांना व भाविकांना शुभेच्छा दिल्या.

जोधपुरी बाबांचा दर्गाह महाराष्ट्रभर प्रसिद्धीस आलेला आहे. या दर्गाहच्या विकासासाठी आपण आजपर्यंत सर्व प्रकारची मदत केलेली असून, आगामी काळातही आपले सहकार्य कायम राहील. जोधपुरी बाबांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत, असे प्रतिपादन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.

याप्रसंगी दर्गाह ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बाबांच्या ऊरूसाचे हे 31 वे वर्ष आहे. दर्गाहला उरूसानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लुमेवाडी येथे निरा नदीकाठी सर्वधर्मियांचे श्रध्दांस्थान असलेला सुफी संत फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा ( रहे.) यांचा दर्गाह आहे. या उरूसास पुणे, सोलापूर, मुंबई, सांगली, सातारा, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड आदी जिल्ह्यातील भक्तांबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातूनही मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी उपस्थिती लावत आहेत. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थ व भाविकांशी संवाद साधला. यावेळी अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते. दरम्यान, जोधपुरी बाबांच्या उरसानिमित्त मंगळवारी दि.24 संदल चा कार्यक्रम असून, बुधवार दि. 25 हा उरुसाचा मुख्य दिवस आहे या दिवशी कव्वाली चा मुकाबला होईल. तर गुरुवार दि.26 रोजी जियारतने उरुसाची सांगता होईल.
____________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here