विधानसभेच्या तोंडावर इंदापूर शेती उत्पन्न बाजार समितीत राजकीय घडामोड; सभापती पदासाठी ओबीसी कार्ड.?

विजय शिंदे 

विधानसभेच्या तोंडावर इंदापूर शेती उत्पन्न बाजार समितीत चांगल्याच राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. सभापती विलास माने व उपसभापती रोहित मोहोळकर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती, उपसभापती पदाचा राजीनामा दिला आहे.

३ ऑक्टोंबर रोजी नवीन सभापती – उपसभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे, विधानसभेच्या तोंडावर जातीय समीकरण साधून कोणाला संधी मिळणार.? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलने विजय मिळवला होता तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे तटस्थ राहिले होते, त्यानंतर आप्पासाहेब जगदाळे यांनी विलास माने व रोहित मोहोळकर यांना सभापती उपसभापती पदाची संधी दिली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकी वेळी आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सभापती विलास माने व इतरही काही संचालकांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला होता.

बाजार समितीवर आप्पासाहेब जगदाळे यांचे वर्चस्व असून ते इंदापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाकडून इच्छुक आहेत यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली असून इंदापूर तालुक्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. जगदाळे हे इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक असल्याने बाजार समितीच्या सभापती- उपसभापती निवडीच्या माध्यमातून जातीय समीकरण साधणार का.?  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणाला संधी मिळणार .? याची चर्चा सुरू आहे.

सभापती पदासाठी निमगाव केतकी येथील माजी उपसरपंच व ओबीसी चेहरा असलेले बाजार समितीचे विद्यमान संचालक तुषार जाधव यांचे नाव चर्चेत आहे. उपसभापती पदासाठी नवखा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती- उपसभापती निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here