विजय शिंदे
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मनात सध्या काय सुरू आहे याचा कोणीही ठाव घेवू शकत नाही. महायुतीत इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत.
त्यांनी आगामी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून तिकीट नाही मिळालं तर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत ही आहेत. शिवाय अपक्ष म्हणून निवडणूक लढता येईल का याचीही ते चाचपणी करत आहेत. मात्र आता एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये परतणार असंही बोललं जात आहे. त्याला निमित्त आहे काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे वक्तव्य. त्यामुळे पाटील काँग्रेस राष्ट्रवादी की अपक्ष याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि हर्षवर्धन पाटील यांचे जूने सहकारी बाळासाहेब थोरात यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, हर्षवर्धन पाटील माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यामध्ये मोठी क्षमता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाऊन चूक केली की काय ? असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आता जरी हर्षवर्धन पाटील भाजपात गेले असले तरी, ते पुन्हा मुख्य रस्त्यावर येतील. असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
हर्षवर्धन पाटील सध्या भाजपा सोडून महाविकास आघाडीकडे येणार अशी चर्चा आहे. या चर्चेमध्ये जाता बाळासाहेब थोरात यांनी हर्षवर्धन पाटील पुन्हा मुख्य रस्त्यावर येतील. असा विश्वास व्यक्त केलाय. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे महाविकास आघाडीमध्ये आल्यास एक प्रकारे स्वागत होताना दिसत आहे. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या मनात काय आहे हे अजून कोणालाही समजले नाही. मात्र गेल्या काही दिवसापासून पाटील यांची महाविकास आघाडीच्या नेत्यां बरोबर जवळीक वाढली आहे. त्यामुळे ते एक प्रकराचे संकेत आहेत का अशीही चर्चा आहे.