विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दगडवाडी येथील श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पुर प्रतिबंधात्मक संरक्षक भिंत व घाट बांधणीच्या कामासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून आज सुमारे ५ कोटींचा निधी मंजुर झाला असुन या निमित्ताने आमदार भरणे यांनी महिनाभरापूर्वी गावकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
श्री क्षेत्र नंदिकेश्वर हे निरा नदीच्या काठावर वसलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असुन हे एक पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे.या तीर्थक्षेत्राचा उल्लेख वेदपुराणातही आढळतो. या ठिकाणी वर्षभर असंख्य भाविकांची मंदियाळी असते.त्यामुळे या तीर्थक्षेत्राचे महत्व लक्षात घेत आमदार दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आजवर लाखो रुपयांचा निधी दिला असुन यातुन अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत.
मात्र हे देवस्थान निरा नदीच्या अगदी काठावर वसले असल्यामुळे निरा नदीला येणाऱ्या पुरामुळे या मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे यावर ठोस उपाययोजना करण्याची सातत्याने मागणी केली होती.
गेल्या महिनाभरापूर्वी आमदार भरणे यांनी श्रावणी यात्रेच्या निमित्ताने श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराची पाहणी करुन या ठिकाणी संरक्षक भिंत व घाट बांधण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता.त्यानुसार आज आमदार भरणे यांनी श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसरात पुर संरक्षक भिंत व घाट बांधणीच्या कामासाठी तब्बल ५ कोटींचा निधी तात्काळ मंजुर करुन ग्रामस्थांना दिलेला शब्द पुर्ण केला आहे..