फडणवीस-पाटील चर्चा निष्फळ; पाटील भाजप सोडणार असल्याचं निश्चित.!!

विजय शिंदे 

माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी मंगळवारी भाजपची साथ सोडली. त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा बडा नेता पक्षाची साथ सोडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची या बड्या नेत्याची चर्चा निष्फळ ठरल्याने भाजप सोडणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे त्यांच्या पक्षाला रामराम करणार आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार असल्याचं निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चा होत्या. येत्या दोन ते तीन दिवसांत हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. पुण्यात पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे इंदापुरातील राजकीय समीकरण?

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ साली काँग्रेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पुढे राष्ट्रावादी फुटून अजित पवार गटाने महायुतीला साथ दिली. त्यानंतर इंदापूर मतदारसंघातील राजकीय समीकरण बदललं. आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील अजित पवारांना सांगितलं. त्यामुळे इंदापूर मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलंय. याचदरम्यान, इंदापुरात भरणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत.

इंदापुरात राजकीय वातावरण तापलं

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील इंदापूर भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो. या दिवशी बैलांना सजवून गावातून मिरवणूक काढली जाते. सध्या इंदापुरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात तापलंय. त्यातच इंदापुर तालुक्यातील भिगवणच्या हर्षवर्धन पाटील प्रेमी शाहरुख शेख या शेतकऱ्याने बैलपोळानिमित्त हर्षवर्धन पाटील 2024 फिक्स आमदार, तुतारी वाजवणारा माणूस अशा आशयाचे चित्र रेखाटलंय. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here