विजय शिंदे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने इंदापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षातील प्रवेशानंतर त्यांच्या कन्या पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अंकिता पाटील- ठाकरे मैदानात उतरल्या असून रविवार दिनांक १३ ऑक्टोंबर पासून त्या इंदापूर तालुक्यात जनसंवाद यात्रेचे आयोजन करणार आहेत.
यावेळी त्या तालुक्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि अन्य मुद्द्यांवर तालुक्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाध्यक्ष खा शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर मतदार संघात उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे पाटील यांचे प्रतिस्पर्धी अजित पवार यांचे समर्थक विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. पाटील यांची उमेदवारी जाहीर होतात त्यांच्या कन्या अंकिता पाटील- ठाकरे यांनी जनसंवाद यात्रेचे आयोजन केल्याने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच इंदापुरात आरोपांच्या फेरी झडणार आहे.
राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांचे बॅनर वरती फोटो..
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातील प्रवेशानंतर अंकिता पाटील -ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेच्या बॅनर वरती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस पक्षाची मदत हर्षवर्धन पाटील यांना उपयुक्त ठरणार आहे.