विजय शिंदे
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजायला काही तासांचा अवधी शिल्लक असताना इंदापूर तालुक्यात मात्र राजकीय पक्ष व कार्यकर्ते मात्र जोरात तयारीला लागले आहेत.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे महाविकास आघाडी कडून तर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे महायुती कडून उमेदवार असणार आहेत, पाटील यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे आपासाहेब जगदाळे व प्रवीण माने हे राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार) इच्छुक आहेत.
इंदापूर तालुक्यात लाडक्या बहिणींना अच्छे दिन आले असून महिन्याला १५०० रुपयांसोबतच घरपोच पैठणी साडी मिळत असल्याने कधी नाही ते या निवडणुकीत नाही महिला वर्ग ही खुश आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात झालेल्या विकास कामांची यादी तयार करून ती यादी तालुक्यातील घराघरात पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. आपलं गाव बदलतंय म्हणत गावात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून झालेली विकास कामांचा उल्लेख या यादी मध्ये केला आहे.सोबतच महिलांना दिवाळीची भेट म्हणून साडी भेट दिली जात आहे, आमदार दत्तात्रय भरणे हे तालुक्यातील विविध ठिकाणी उपस्थित राहून केलेल्या कामांचे लोकार्पण तसेच मंजूर कामाचे उद्घाटन करत आहेत.
दुसरीकडे होम मिनिस्टर च्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनीही उपस्थित सर्व महिलांना पैठणी भेट देत लाडकी बहीण योजनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. माने यांच्या होम मिनिस्टर ला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इंदापूर तालुका पैठणीमय झाला आहे. यावेळी प्रवीण माने मित्र परिवाराच्या वतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात असल्याने कार्यक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
साडी देऊन मते मिळत नसतात.. विरोधकांची टीका.
पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील- ठाकरे यांनीही इंदापूर तालुक्याचा दौरा सुरू केला असून, तालुक्याच्या गावोगावी जाऊन “मलिदा” गॅंग हटाव तालुका बचाव असा नारा त्या देत आहेत. साडी वाटून मते मिळत नसतात असा सल्लाही त्या विद्यमान आमदारांना देत आहेत तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन त्या करत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील महिलांना खुश करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत, या कारणाने इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांचा उद्घाटन व साडी वाटपाचा सपाटा दिसून येणार आहे.