विजय शिंदे
महाराष्ट्रात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले असून इंदापूर तालुक्यात छोट्या सभा, मेळावे, उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या जोमात सर्वपक्षीयांकडून सुरू आहेत, परंतु महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या व इंदापुरात दिशाहीन झालेल्या काँग्रेस पक्षामध्ये गट-तट निर्माण झाले आहेत. इंदापूर येथे झालेल्या महा परिवर्तन सभेस तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबा निंबाळकर उपस्थित राहिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
इंदापूर काँग्रेसचे अध्यक्ष आबा निंबाळकर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील बंडखोरांनी आयोजित केलेल्या परिवर्तन सभेला उपस्थित राहिल्याने इंदापुरातील बोटावर मोजण्याइतकी राहिलेली काँग्रेस कोणासोबत.? अशी चर्चा रंगू लागली आहे.
त्यातच काँग्रेस पक्षाचे नेते काकासाहेब देवकर यांनी आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर हे एकटेच पाटील यांच्या विरोधात असल्याचे दिसून येते.
इंदापूर तालुक्यातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार सोबत राहिली नाही तर त्याचे थेट परिणाम पुरंदर मध्ये काँग्रेसचे आमदार व जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते काम करतील अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
त्यामुळे इंदापुरातील काँग्रेस एक संग होऊन हर्षवर्धन पाटील यांचे काम करतील अशी माहिती काकासाहेब देवकर यांनी दिली. त्याचबरोबर बोलताना काकासाहेब देवकर म्हणाले इंदापूर येथील काँग्रेस भवन चा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे तो आता विधानसभेचा विषय नाही, त्यामुळे आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे.