विजय शिंदे
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचा लवकरच बिगूल वाजणार आहे. कारण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक समजली जात आहे. अशातच आज निवडणुक आयोगाची देखील मुंबईत महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.
या पत्रकार परिषदेत निवडणुक आयोग महाराष्ट्रासाठी विधानसभेची घोषणा करणार का ? असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच विधानसभेचा बिगुल वाजणार असे समजले जात आहे.
अलिकडेच जम्मू काश्मिर आणि हरियाणा राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. तर महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या देखील येत्या काही दिवसात विधानसभेची निवडणूक होणार आहे. यातच महाराष्ट विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्याआधी महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यानुसार आज निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोग विधानसभेची घोषणा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकां सुरू होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे अनेक महत्वाचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. अशातच राज्याच आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भाजपची लगेचच पहिली यादी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी देखील समोर येणार असल्याचे बोललं जात आहे.