विजय शिंदे
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर केली. निवडणूक जाहीर झाल्यानंतरही दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. येत्या काही दिवसांत दोन्ही आघाड्यांकडून जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
या दोन्ही आघाड्यांमध्ये राष्ट्रवादींच्या दोन्ही गटांना किती जागा मिळणार, हे निश्चित झालेले नाही. याचदरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीची पहिली लढत ठरली आहे. पुण्यातील इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादींमध्ये थेट सामना होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघाची लढत ठरल्याचं बोललं जात आहे. या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या विधानसभा मतदारसंघातून आमदार दत्तात्रय भरणे हे २५ ऑक्टोबरला उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती हाती आली आहे. अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीत शरद पवार गटाचा या मतदारसंघावर दावा आहे. तर शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इंदापुरात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील पहिली लढत ठरल्याचं बोललं जात आहे.
दत्तात्रय भरणे उमेदवारी अर्ज दाखल करणार
आमदार दत्तात्रय भरणे २५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी अकरा वाजता इंदापूर शहरात शक्तिप्रदर्शन करत दाखल उमेदवारी अर्ज करणार आहेत. मात्र अद्याप महायुतीतून भरणे यांना उमेदवारी फिक्स नसताना ते उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे भरणे यांनी इंदापूर तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.
काय आहे इंदापुरातील राजकीय समीकरण?
इंदापुरातील राजकारण गेल्या १५ वर्षांपासून आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भोवती फिरत आहे. २००९ साली दत्तात्रय भरणे यांनी बंडखोरी करून हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भरणे यांचा पराभव झाला होता. पुढे २०१४ आणि २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला होता. या दोन्ही वेळा भरणे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती.
शरद पवार यांच्या सांगता सभेमुळेच भरणे यांचा विजय झाल्याचे जाणकार सांगतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भरणे यांनी राज्यमंत्रिपदही भुषवलं होतं. पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भरणे यांनी अजित पवारांना साथ दिली. तर लोकसभेत इंदापुरात अजित पवार गटाचं एकहाती वर्चस्व असताना सुप्रिया सुळे यांना २५,९५१ मताधिक्य मिळालं होतं.
दरम्यान, शरद पवार गटाकडून पहिली यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात इंदापुरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे इंदापुरात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीची तयारी करा आणि कामाला लागा, अशा सूचना दिली असल्याचे समजते.