विजय शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर देशाच्या नजरा बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागल्या आहेत. सलग तीनदा खासदार झालेल्या सुप्रिया सुळे यांना यंदा पवार कुटुंबातील सदस्य सुनेत्रा पवार यांचे आव्हान असेल, अशीच लढत झाली तर बारामती तालुक्यात मतांचे थेट विभाजन होईल. याशिवाय बारामती तालुक्यासह लोकसभा मतदारसंघातील इतर ग्रामीण भागातही शरद पवार यांना मानणारा किंवा सहानुभूती बाळगून असणारा वर्ग आहे.परिणामी दौंड, खडकवासला, इंदापूर आणि पुरंदर इथे मतांची आघाडी मिळवायला आणि घडाळ्याच्या चिन्हावर उमेदवार विजयी करण्यासाठी अजित पवारांना ‘कमळा’ची म्हणजेच भाजपची साथ लागणार आहे.भोर-वेल्हा-मुळशीसह एकूण मतदारसंघात ‘मविआ’ची ताकद एकत्र करण्यासाठी शरद पवार काम करत आहेत.
बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेलं आहे. २०१९ मध्ये अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव करून भाजपने काँगेसच्या गडाला सुरूंग लावला.त्यानंतर भापने आपला मोर्चा वळवला तो शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. A फॉर अमेठी आणि B फॉर बारामती असे म्हणत भाजपने अमेठी पॅटर्न राबवण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं आहे.
बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी भोर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे आता पवार विरूध्द पवार अशा लढतीवर देशाचं लक्ष लागून राहणार आहे.
एकूण परस्थिती ..?
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभांचा समावेश आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर- हवेली, भोर, आणि खडकवासला या सहा मतदारसंघाचा समावेश होतो. मात्र दोन्ही उमेदवारांसाठी बारामतीचा मतदार का महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आत्ता मिळाले मागील लोकसभेच्या निकालांचे विश्लेषण केले तर समजते २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना महादेव जानकर यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून ९०६२८ मतांचे लीड मिळाले होते. तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघातून २१६९३ मतांचे लीड मिळाले होते. आणि भोर विधानसभा मतदारसंघातून १६८८५ मतांचे लीड मिळाले होते. मात्र या निवडणूकीत सुप्रिया सुळे फक्त ६९७१९ मतांनी विजयी झाल्या होत्या. म्हणजेच बारामतीकरांनीच सुप्रिया सुळे यांना खासदार केले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
२०१९ चा विचार केला तर बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना १२७९१८ मतांचे लीड मिळाले होते. तर इंदापूर विधानसभा मतदार संघातून ७०९३८ मतांचे लीड मिळालं होतं. याशिवाय पुरंदर मधून ९६८१ आणि भोर विधानसभा मतदारसंघातून १९००४ मतांचे लीड मिळाले. तेव्हा सुप्रिया सुळे खासदार झाल्या. याचा अर्थ २०१९ मध्ये सुप्रिया सुळे यांना इतर पाच मतदारसंघातून अवघे २७८५६ मतांचे लीड मिळाले होते. यावेळी देखील सुप्रिया सुळे यांना बारामतीकरांनीच खासदार केले.
दुसरी गोष्ट म्हणजे २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाने OBC उमेदवार देत ४४१३४ मतं खाल्ली. यामध्ये या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे १०४५८ मतं इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती. त्यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी आघाडी म्हणून सुप्रिया सुळे यांना मदत केली होती.
२०२४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अधिक प्रतिष्ठेचा केला आहे. इंदापूर दौंड खडकवासला भोर वेल्हा पुरंदर या मतदार संघावर ज्यांची कमांड तोच भावी खासदार होवू शकतो.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे जातिय समीकर पाहिले तर मराठा समाज साधारणपणे ४०% आणि OBC समाज ३८% च्या आसपास आहे. त्यामुळे मराठा समाज विभागला जाणार हे समीकरण आहे. मात्र OBC समाज कोणाच्या पारड्यात मत टाकणार यावर निकाल अवलंबून राहू शकतो.
या नेत्यांची भूमिका महत्त्वाची…
इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचा राजकीय संघर्ष राज्याला माहित आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार हे देखील पाहणं तितकचं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर माजी मंत्री विजय शिवतारे यांना पराभूत करण्यात आणि संजय जगताप यांना विजयी करणात अजित पवार यांची महत्त्वाची भुमिका होती. त्यामुळे पुन्हा आमदार होण्यासाठी विजय शिवतारे अजित पवार यांना मदत करणार की झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कुरघोड्या करणार, याशिवाय संजय जगताप हे अजित पवारांनी केलेल्या मदतीची परत फेड करून अंतर्गत मदत करणार का, आगामी संधी पाहून महाविकास आघाडीचे काम प्रमाणिक करणार..?
दौंड विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर २००९ मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल कूल यांच्या विरोधात अपक्ष उमेदवाराला अंतर्गत मदत केली होती. असे स्थानिक लोक सांगतात. त्यामुळे विद्यमान आमदार राहुल कूल पक्ष आदेश मानणार की त्या पराभवाचा वचपा काढणार हे पाहणं देखील तितकच महत्त्वाचं ठरणार आहे, त्यामुळे सध्या तरी कोणाचं परडं जड हे सांगणं जरा अवघड आहे. मात्र हे नेते या निवडणूकीत काय भूमिका घेणार यावर देखील अनेक समीकरणं अवलंबून आहेत.
कोणाची सभा वाजणार..
इंदापूर तालुक्यात यापूर्वी अजित पवार यांनी शेतकरी मेळावा घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली येत्या २३ मार्च रोजी इंदापुरात त्याच मैदानावर महायुतीची सभा होणार असून खासदार शरद पवार ,खा संजय राऊत व बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे या सभेला किती गर्दी जमणार.? अजित पवारांच्या सभेपेक्षा सभा मोठी होणार .? याची चर्चा सुरू आहे.