विजय शिंदे
इंदापूर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून इंदापूर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये तुल्यबळ अशी लढत होणार आहे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत तर माजी राज्यमंत्री व इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडापुरी- काटी गटात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या(अजित पवार) कार्यकर्त्यांच्या घोंगडी बैठका चौक- सभा सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अतुल झगडे,वडापुरी पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे, बापू शेंडे, विष्णू पाटील, हेमंत पाटील तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित कार्यकर्ते मतदारांना मार्गदर्शन करत आहेत.आमदार दत्तात्रय भरणे यांनी या दहा वर्षात केलेली विकास कामे, शासनाची लाडकी बहिण योजना यासह विविध योजनांची माहिती हे पदाधिकारी कोपरा सभा तसेच घोंगडी बैठकीतून मतदारांना देत आहे. तसेच दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज येत्या २५ ऑक्टोंबर रोजी भरण्यासाठी इंदापूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या सोबतच आमदार दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे, अनिकेत भरणे तसेच भरणे कुटुंबियातील महिलाही प्रचारात सहभाग घेत असून गावोगावी वाडी वस्तीवर जाऊन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेली विकास कामे, महिलांना तसेच नागरिकांना पटवून देत आहे.
इंदापूर तालुक्यात विधानसभेसाठी अर्ज भरण्यापूर्वीच वातावरण चांगलेच तापले असून येत्या काही दिवसात प्रचाराला अधिक रंगत येणार आहे.