विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार विरुध्द पवार सामना पहावयास मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बारामती अजित पवार विरुध्द त्यांचे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांच्या प्रचाराची सुत्रे त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह मुले पार्थ पवार, जय पवार यांनी हाती घेतली आहेत. तर, युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सुत्रे त्यांचे वडील श्रीनिवास पवार, आई शर्मिला पवार यांनी हाती घेतली आहेत.
योगेंद्र पवार यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्ज दाखल केल्यानंतर पवार कुटुंबियांचे श्रद्धास्थान असलेल्या बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मारुती मंदिरात सकाळी साडे नऊ वाजता नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खा सुप्रिया सुळे, कार्यकर्त्यांना मार्गशन करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत.
शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ कन्हेरीच्या मंदिरातून फुटला होता. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांचे श्रद्धास्थान असलेला कण्हेरीचा मारुती कोणत्या दादाला पावणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.प्रत्येक विधानसभेला भावासाठी शड्डुू ठोकणाऱ्या श्रीनिवास पवार यांनी आता लेकासाठी शड्डु ठोकला आहे.
आज हर्षवर्धन पाटील काय बोलणार.?
माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील हे आज युगेंद्र पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी बारामती तालुक्यात येणार आहेत, इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांच्यावर टीका केली होती, त्या टीकेला आज हर्षवर्धन पाटील उत्तर देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.