विजय शिंदे
इंदापूर विधानसभा मतदार संघातील लढाईमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू असून यामध्येच अपक्ष उमेदवार प्रवीण माने रिंगणात उतरल्याने इंदापूरच्या या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने खा शरद पवार हे इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत असून ते उद्या(3 ) इंदापूर तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शरद पवार हे उद्या इंदापुरात अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असून त्यामुळे इंदापुरात राष्ट्रवादी अंतर्गत असणारे वाद विवाद संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे. राजकीय नेते उद्यापासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काहीही करून इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विजयी करून, इंदापूर हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे असा संदेश राज्यात देण्याच्या उद्देशाने शरद पवार मैदानात उतरले असल्याचे दिसून येत आहे.उद्याच्या दिवसभरांच्या भेटीत शरद पवार कोणाला भेटणार.? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.