विजय शिंदे
माजी मंत्री व महाविकास आघाडीचे इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत, अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडल्यानंतर पाटील यांना आज आणखी एक धक्का बसला आहे.कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन स्वर्गीय नानासाहेब व्यवहारे यांचे पुत्र व कर्मयोगी चे माजी संचालक अतुल व्यवहारे हे आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज(१०) इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असून रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंदापूर शहरात श्री संत सावता माळी मंदिरामध्ये अतुल व्यवहारे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत.
हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून अतुल व्यवहारे यांची ओळख होती.गेल्या दोन दिवसापूर्वी इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन देवराज जाधव, कर्मयोगी चे संचालक वसंत मोहोळकर यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडल्यानंतर आता अतुल व्यवहारे यांनी देखील मोठा राजकीय निर्णय घेतला आहे, त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे एकाकी पडल्याचे दिसून येत आहे.
माळी समाजाचे नेते म्हणून अतुल व्यवहारे यांची ओळख असून स्वराज विकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून अतुल अतुल व्यवहारे समाजकारण आणि राजकारणात सक्रीय आहेत.त्यांचे वडील स्वर्गीय नानासाहेब केरबा व्यवहारे हे कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या सोबत तालुक्याच्या राजकारणात सक्रीय होते.कर्मयोगी शंकराव पाटील यांनी कारखान्याची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपवली होती.
गेल्या अनेक वर्षाचे पाटील आणि व्यवहारे परिवाराचे कौटुंबिक संबंध होते.हर्षवर्धन पाटील यांनी देखील व्यवहारे यांना कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याची संचालक पदाची जबाबदारी सोपवली होती.दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अतुल व्यवहारे हे राजकारापासून अलिप्त राहिल्याचे पहायला मिळाले.
नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणार…
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत गेली वीस वर्षे काम करणाऱ्या अनेक सहकार्याने साथ सोडल्याने हर्षवर्धन पाटील यांच्याकडे नवीन कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे, जे सहकारी सोडून गेले ते हर्षवर्धन पाटील यांच्या सत्ता काळातील पदाधिकारी होते अनेक वेळा त्यांना सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेवर काम करण्याची पाटील यांनी संधी दिली, त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील हे नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करतील अशी चर्चा आहे.