विजय शिंदे
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत महायुती चे उमेदवार दत्तात्रय भरणे आणि महाविकास आघाडीचे हर्षवर्धन पाटील यांच्यातील लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. महायुतीकडून भरणे तर महाविकास आघाडीकडून पाटिल यांची लढत तुल्यबळ होत असताना अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्यामुळे इंदापुरात तिरंगी व रंगतदार लढत होणार आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तसेच अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्यातच खरी लढत होणार आहे.
इंदापूर मध्ये चुरशीची लढाई होत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांच्या विजयाची उमेद ही इंदापूर शहर, बावडा- लाखेवाडी, काटी वडापुरी, सणसर-लासुरणे, भिगवन -शेटफळगडे, पळसदेव बिजवडी, निमगाव केतकी- निमसाखर, वालचंदनगर- कळस, या उमेदवारांचे ज्या भागात प्राबल्य असेल तोच उमेदवार विजयापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच अपक्ष असणारे प्रवीण माने हे पळसदेव- बिजवडी गटातील जिल्हा परिषद सदस्य असल्याने ते कोणाला धक्का देणार? त्यांचे मताधिक्य हे निर्णायक ठरणार आहे .
सध्याच्या घडीला इंदापूरच्या राजकारणात मोठे धक्के देण्यासाठी दत्तात्रय भरणे कामाला लागले आहेत. पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, वसंत मोहोळकर, कांतीलाल झगडे, देवराज जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेला इच्छुक असणारी कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू झाली आहे. त्यातूनच इंदापूरची पुढील रणनीती ठरणार आहे.
आमदार दत्तात्रय भरणे यांची विकास कामे, नव्याने सोबत आलेल्या नेत्यांची ताकद ही जमेची बाजू आहे तर शरद पवार यांची साथ सोडणे, महायुती बरोबर जाणे याचा फटका त्यांना बसू शकतो.विकास कामाच्या जोरावरच ते निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत. शिवाय मागील पाच वर्षात सत्ताधाऱ्यांकडून निधी आणत दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेची तयारी केली आहे.
मात्र एनवेळी उमेदवारीची अडचण झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी मिळवली. इंदापूरच्या या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर होणार हे निश्चित आहे.
इंदापूर विधानसभा निवडणुकीत आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मूळ कार्यकर्त्यांसह नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा अधिक आहे तर हर्षवर्धन पाटील यांच्याकडे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यावरच विजयाचे समीकरण अवलंबून आहे.
दत्तात्रय भरणे यांना थेट जनतेचा विरोध नसला तरी दुसऱ्या फळीतील नेत्यांवर नागरिकांची नाराजी आहे. त्याशिवाय शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर मतदारसंघांमधील असलेली मत रुपी ही नाराजी भरणे बदलणार कसे याचे मोठे आव्हान असणार आहे. याउलट हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सत्तेच्या काळात सत्ता भोगणारे नेते सोडून गेल्याने पाटील यांच्या भोवती सहानुभूतीची लाट तयार झाली असल्याचे दिसून येत आहे.