विजय शिंदे
विधानसभा निवडणुकांसाठीच्या लढती निश्चित झाल्यानंतर आता प्रचाराला गती मिळाली आहे. इंदापुरात तिरंगी लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडी कडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महायुतीकडून आमदार दत्तात्रय भरणे तर अपक्ष म्हणून सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, बड्या नेत्यांच्या सभांसह इंदापूर मतदारसंघात कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत पहिल्या फळीतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांची सख्ख्या चुलत भावांनी ही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडली.
असे असताना हर्षवर्धन पाटील यांना दिलासा देणारी बातमी असून इंदापूर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या मध्ये फूट पडली असून आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष व सध्याचे पुणे जिल्हा सरचिटणीस संदिपान कडवळे यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ते मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संत सावता माळी मंदिर सभागृह इंदापूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील त्याचबरोबर पक्षाचे इतरही पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.अत्यंत संयमी शांत व उच्चशिक्षित असलेले संदिपान कडवळे यांच्या पक्ष प्रवेशाने निश्चितच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.