शिवरत्नवर आज बैठक.. मोहिते -पाटील तुतारी फुकणार.?

विजय शिंदे

माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची अपेक्षा असताना पुन्हा एकदा भाजपश्रेष्ठींनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहेअस्वस्थ आणि नाराज झालेले मोहिते पाटील समर्थक आज सकाळपासूनच शिवरत्नकडे धाव घेऊन विजयदादांकडे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. बाहेरगावी असलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अकलूजमध्ये परतण्याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे.

मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2014 मध्ये माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला होता. मात्र 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या मतदारसंघातून फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने तिकीट दिले. राष्ट्रवादीत होणारी कोंडी लक्षात घेता भाजपच्या तंबूत आलेल्या मोहिते पाटलांनी निंबाळकर यांना माळशिरसमधून तब्बल एक लाखाचे लीड देऊन निवडून आणले होते. मात्र, काही दिवसांतच निंबाळकर यांच्याशी मोहिते पाटील समर्थकांचे खटके उडू लागले.

गेली वर्ष- दीड वर्षापासून मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामध्ये तीव्र मतभेद होते, त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासूनच मोहिते-पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली होती. निंबाळकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता.मोहिते पाटलांच्या विरोधानंतरही भाजपने माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट दिल्याचे तीव्र पडसाद अकलूज आणि माळशिरस तालुक्यात उमटले तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक आणि आज सकाळपासूनच ‘शिवरत्न’कडे धाव घेऊन विजेचे मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली आणि निंबाळकर यांच्या उमेदवारीबद्दल तीव्र नाव पसंती व्यक्त केली. विजयदादांनी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या.

सोशल मीडियावर भावना

‘आपला माणूस आपला खासदार’ म्हणून मोहिते पाटील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट केल्या होत्या. अनेकांनी अतिशय तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत तर काहींनी सबुरीचा सल्ला दिला.

शिवरत्नवर आज बैठक

माढ्यातून लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपने डावल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांची उद्या (ता. १५ मार्च) शिवरत्न बंगल्यावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत मोहिते पाटील यांची भूमिका ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपने उमेदवारीसाठी डावलल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेचे निवडणूक लढवावी, अशी भावना व्यक्त केली आहे, तर काहींनी शरद पवार यांची साथ घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरावे, अशीही मते व्यक्त केली आहेत, त्यामुळे उद्या शिवरत्नवर होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here