विजय शिंदे
राज्यात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार सत्तेवर आलेनंतर महालक्ष्मी योजना सुरु करून महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना रु. 3000 प्रमाणे रक्कम जमा करणार आहे. तसेच महिलांना मोफत एसटी प्रवास, मुलींना 18 वर्षे पूर्ण झालेवर रु. 1लाख रक्कम व महिलांना वर्षाला 500 रुपयात 6 सिलेंडर देण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केले आहे. आमचे महाविकास आघाडी सरकार हे महिला भगिनींचे सरकार असणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.12) सुरवड, पिंपरी बु., लाखेवाडी, निरवांगी, वरकुटे खु. या गावांचा झंझावती प्रचार दौरा केला. या दौऱ्यात सुरवड (ता. इंदापूर) येथील सभेत हर्षवर्धन पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या जाहीरनाम्याची माहिती दिली.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे रु. 3 लाख पर्यंतचे कर्ज माफ केले जाईल तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपुर अनुदान देण्यात येणार आहे. दुधाच्या उत्पादन खर्चानुसार प्रत्येक वर्षी दुधाला दर दिला जाईल. तसेच प्रत्येक कुटुंबाला रु. 25 लाखाचा आरोग्य विमा देणार आहोत. शिवाय सुशिक्षित बेरोजगार युवकांना दरमहा 4 हजार रुपयांची मदत केली जाईल, आदी जाहीरनाम्यातील लोकहिताच्या तरतुदींची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूरच्या विद्यमान आमदारांना शरद पवारांनी आजपर्यंत 25 वर्षात भरभरून पदे दिली. तरीही त्यांनी 84 वर्षीय पवार साहेबांच्या विरोधात जाऊन गद्दारी केली आहे. तसेच दुसऱ्या उमेदवारालाही शरद पवारांनी उद्योग धंदे उभारणीसाठी परवाने, सवलती, अनुदान आदी विविध प्रकारे मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांना दोन्ही उमेदवारांनी विरोध केल्याने मतदारांनी त्यांना जागा दाखवून द्यावी, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
अनेक जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेल्या 2 दिवसात प्रवेश केला आहे. सन 1952 पासून शंकररावजी पाटील (भाऊ) च्या शिकवणीनुसार सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन आंम्ही काम करीत आहोत. इंदापूर तालुक्याचा आंम्ही सत्तेवर असताना 20 वर्षांमध्ये केलेला सर्वांगीण विकास जनतेला माहित आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात नमूद केले.
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड. तेजसिंह पाटील, शिवसेने (उबाठा) चे नितीन शिंदे, उदयसिंह पाटील, शिवाजी हांगे, बळीराम शिंदे, संजय कांबळे, शंकर शिंदे, संजय शिंदे, निलेश जगताप, अरुण पवार, प्रीतम देवकर, दादा तोबरे, ओंकार नलावडे, रुपनवर वकीलवस्ती, आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुरेश मेहरे यांनी केले. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, विलासबापू वाघमोडे, अमोल भिसे, काँग्रेस पक्षाचे काका देवकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सूर्यकांत फडतरे यांनी केले.
युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन भाऊ पाटील यांना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आणायचे आहे, या इर्षेने सुरवड, वकीलवस्ती, शेटफळ हवेली, भोडणी, पंधरवाडी, वडापुरी गावातील युवक वर्ग कामाला लागल्याचे चित्र या कार्यकर्ता बैठकीमध्ये दिसून आले. हर्षवर्धन पाटील यांचे बद्दल युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य दिसून येत आहे.
_____________________________