महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी आज शरद पवार मैदानात; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष.

विजय शिंदे 

इंदापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी इंदापूर येथील सनसर या गावात सभा होणार आहे.‌ शरद पवार हे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी दोन सभा घेणार असून आज सनसर येथे तर उद्या इंदापूर येथे सांगता सभा होणार आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी इंदापुरात अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना कडवे आव्हान दिले आहे.
त्यामुळे आज होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.ते नेमकं काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार.? आंबेगाव येथे बोलताना त्यांनी गद्दारांना जागा दाखवा अशा कडक शब्दात दिलीप वळसे पाटील यांना पाडा असे आवाहन मतदारांना केले होते. त्यामुळे ते इंदापूर तालुक्यातील सनसर येथे काय बोलणार याकडे विरोधकांचेही लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. या दोन दिवसांत राज्यातील मातब्बर नेत्यांच्या प्रचाराच्या सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराची सभा रविवारी ( दि १७) दुपारी ३ वाजता छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या सनसर गावात होणार आहे.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. या निवडणूकीत दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील व अपक्ष प्रवीण माने यांच्यात थेट लढत आहे. मागील महिनाभरापासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here