विजय शिंदे
छत्रपती कारखाना भरणेंच्या हातात दिला, ही आमची चूक झाली. इतर कारखान्यांपेक्षा या कारखान्यात भाव कमी मिळतो. ६०० रुपये भाव कमी मिळतो. अनेक गोष्टींमध्ये भरणेंना मदत केली. गुजरातच्या उद्योगपतींकडून मदत मिळवून दिली. त्यांना वाहतुकीच्या धंद्यात मदत केली. निवडणुकीला उभं राहायचं म्हणाले. जिल्हा परिषद, विधानसभा , मंत्रिपद दिलं. सगळं दिल्यावर निघून गेला. ही कसली माणसं आहेत. यांच्या पाठिला कणा नाही. हे नेतृत्व खोटं निघालं. रुपया खोटा निघाला. उद्याचं निकाल घावा लागला. भरणेंना… पाडा… पाडा ..पाडा ..हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्या”, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते इंदापूरमध्ये बोलत होते. हर्षवर्धन पाटलांच्या प्रचारसभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, सध्या तरुण पिढीमध्ये बेकारीचं प्रमाण वाढलं आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये 4 लाख विद्यार्थी शिकतात. बारामती सारख्या ठिकाणी विद्या प्रतिष्ठाण सारखी संस्था स्थापन काढली. हर्षवर्धन पाटलांनी देखील काही संस्था काढल्या. चिंता एका गोष्टीची आहे, मुलं शिकली पण सर्वांनाच नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे तरुण निराशेत जगतो. ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते लोक बेकारी कमी करण्यासाठी प्रयत्न करतील. पण तसं काही झालं नाही. महाराष्ट्रात अनेक चांगले कारखाने होते, लोकांच्या हाताला काम देत होते. देवेंद्र फडणवीसांचं राज्य आलं, हळूहळू महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला गेले.
आम्ही ठरवलं घटनेला धक्का लागू द्यायचा नाही. मोदींना 400 जागा मिळू द्यायचे नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया चौथ्यांदा उभी राहिली. तिला तुम्ही साथ दिली. महाराष्ट्रात अनेक जागा तुम्ही निवडून दिल्या. आता विधानसभेची निवडणूक आहे. राज्य चांगल्या वाटेवर आणण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आपल्या राज्याचा पहिला क्रमांकावर होता. फडणवीसांचं आणि भाजपचं राज्य आलं की, आपण सहाव्या क्रमांकावर आलो. दिवसेंदिवस आपली निर्यात कमी होताना दिसत आहे, असंही शरद पवारांनी नमूद केलं.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही अनुकूल निर्णय दिला. आम्हाला देशाची चिंता वाटत होती, कारण नरेंद्र मोदींच्या मनात सत्ता आल्यानंतर वेगळा विचार सुरु होता. त्यांनी संविधान बदलाचा विचार सुरु केला होता. आज हा देश एकसंघ आहे, याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले घटना आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. खाली श्रीलंका आहे, तिथे संघर्ष झाला. देश एकसंघ राहण्याची स्थिती चिंताजनक झाली. बांगलादेशच्या राष्ट्रपतींची हत्या झाली. भारतात लष्कराने देशाचा कारभार घेतला, असं कधी झालं नाही. या देशातील लोकांचं वैशिष्ट आहे. रोजगार हमीवर जाणाऱ्या लोकांच्या मताचं महत्त्वही तेवढचं आहे.