विजय शिंदे
रेडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद पुन्हा सुनिता नानासाहेब देवकर यांचेकडे आले आहे. यासंबंधीचा आदेश राज्य शासनाच्या अव्वर सचिव यांनी दि.13 मार्च रोजी काढला. त्यानंतर सुनीता देवकर यांनी गुरुवारी (दि. 14) सरपंचपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आपला जल्लोष साजरा केला.
या ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे सरपंच सुनीता देवकर यांच्या विरोधात तक्रार केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्त पुणे यांनी सरपंच पदाबाबत दिलेल्या आदेशास राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आल्याने सरपंचपद पुन्हा सुनीता देवकर यांच्याकडे आले आहे. त्यामुळे सुनीता देवकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन सरपंचपदाचा पदभार पुन्हा स्वीकारला. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता देवकर यांना हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी कार्यरत राहू, असे पदभार स्वीकारल्यानंतर सरपंच सुनीता देवकर यांनी सांगितले.