इंदापुरात किटलीमुळे “घड्याळाची” वेळ चुकली.? एकत्रित राष्ट्रवादीचे मतदार भरणे- माने यांच्यात विभागले, इंदापुरात तुतारी वाजल्याची चर्चा.!!

विजय शिंदे 

विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती निकालाची. मात्र त्या आधी काही अंदाज व्यक्त केले जात आहेत. महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी काही अंदाज व्यक्त केले जात आहेत.

विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे महायुतीकडून (राष्ट्रवादी- अजित पवार ) तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी -शरद पवार) हर्षवर्धन पाटील मैदानात उतरले होते.पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने हे अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेच्या आखाड्यात उतरल्याने इंदापूरची निवडणुक तिरंगी झाली.

निकालाचे वैशिष्ट्य काय.?

१) अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी निर्णायक मते घेतली असून ते मूळचे राष्ट्रवादीचे असल्याने दत्तात्रय भरणे व प्रवीण माने यांचे बऱ्यापैकी गावांमध्ये कार्यकर्ते एकच आहेत, या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बरेसे कार्यकर्ते प्रवीण माने यांचा प्रचार करताना दिसून आले.

२) निवडणुकीच्या तोंडावर काही सहकाऱ्यांनी पाटील यांची साथ सोडल्याने पाटील यांच्यापासून (२०१४-२०१९) दुरावलेले जुने सहकारी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष तुतारी सोबत आल्याचे दिसून आले.

३) खा शरद पवार यांना मानणारे सर्व समाजातील मतदार हर्षवर्धन पाटील यांच्या मागे एकवटल्याच्ये दिसून आले.

४) प्रवीण माने हे हर्षवर्धन पाटील यांची मराठा मत विभाजन करण्याच्या उद्देशाने महायुतीच्या नेत्यांनी उभे केले असल्याचे मतदारांना सांगण्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार )चे कार्यकर्ते यशस्वी झाले.

५) इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रय भरणे यांची कोट्यावधीची विकास कामे. परंतु पक्षांतर्गत गटबाजी व गावागाड्यातील दोन गट यांच्यातील वाद जाणवले.

कोणत्या गटात कोणाचे लीड..?

१) भिगवन-शेटफळ गडे.

या गटात भिगवन गणातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना अधिकचे मतदान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे तर शेटफळगडे गणात आमदार दत्तात्रय भरणे यांना अधिकचे मतदान होईल असा अंदाज वर्तवला जात आहे,दोन्ही गणाचे एकत्रित मतदान केल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील हे भिगवन शेटफळगडे गटातून ७०० ते १२०० मताची आघाडी घेतील अशी शक्यता आहे.

२ पळसदेव-बिजवडी

या गटातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आघाडी घेतली होती, यावेळेस मात्र चित्र वेगळे असून एकत्रित राष्ट्रवादीतून तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण माने हे बाहेर पडले, ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत यामुळे प्रवीण माने हे निर्णायक मते घेणार असून त्याचा अधिकचा फटका हा दत्तात्रेय भरणे यांना बसला असल्याची चर्चा आहे, पळसदेव गणात पाटील यांचे तुतारी वाजल्याची जोरदार चर्चा आहे तर बिजवडी गणात बिजवडी पडस्थळ कालठण वगळता इतर गावात घड्याळाचा बोलबाला आहे, परंतु प्रवीण माने यांची किटली गटातील प्रत्येक गावात चालल्याने घड्याळाचे मताधिक्य मात्र घटल्याची चर्चा आहे.

एकूण परिस्थिती पाहता ५०० ते ९०० मतांनी महाविकास आघाडीचे हर्षवर्धन पाटील यांची आघाडी राहण्याची शक्यता आहे.

३)वडापुरी- काटी

वडापुरी काटी हा जिल्हा परिषद गट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराचा मानला जातो, वाडापुरी गणातील शहा- महादेवनगर हे गाव वगळता सर्व गावात पाटील यांची तुतारी मताधिक्य घेईल अशी चर्चा आहे.

तर काटी गणात ही एखाद दुसरे गाव वगळता पाटील यांची तुतारी चालली असल्याची चर्चा आहे. एकूण मतदानापैकी ३ ते ४ हजाराचे मताधिक्य पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे.

४) निमगाव- शेळगाव

या गटात आमदार दत्तात्रय भरणे यांचे वर्चस्व आहे, परंतु प्रवीण माने यांच्या अपक्ष उमेदवारीने आमदार दत्तात्रय भरणे यांचे मताधिक्य भेटणार असल्याची चर्चा आहे, या भागात माने यांचा सोनाई दूध उद्योग आहे, या भागातील अनेक मुलांना सोनाई उद्योगाने रोजगार उपलब्ध करून दिल्याने माने हे निर्णायक मते घेणार असून त्याचा फटका आमदार भरणे यांच्या वाढत्या मताधिक्याला बसू शकतो. असे असले तरी आमदार दत्तात्रय भरणे हे या गटातून ३ ते ४ हजारांचे मताधिक्य घेऊ शकतात.

या गटातील शेळगाव- गौतंडी या भागात किटली चालल्याची चर्चा आहे तसे झाल्यास आमदार दत्तात्रय भरणे यांचे मताधिक्य घटू शकते.

५) कळस -वालचंदनगर

आमदार दत्तात्रय भरणे यांचा घरचा हा जिल्हा परिषद गट या गटातून आमदार दत्तात्रय भरणे ६ ते ७ हजाराचे मताधिक्य घेऊ शकतात अशी चर्चा आहे. या गटात अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची किटली काही गावात प्रभावीपणे चालल्याचे बोलले जाते, दत्तात्रय भरणे यांना हमखास लीड देणाऱ्या बोरी गावात किटली ने घड्याळाचे मताधिक्य कमी केल्याची चर्चा आहे तसे झाल्यास आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अडचणी वाढू शकतात.

६) सणसर – लासुर्णे

या गटात २०१९ विधानसभा निवडणुकीत आमदार दत्तात्रय भरणे यांना मताधिक्य मिळाले होते, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेले या भागात शरद पवार यांनी सभा घेतली होती त्याचा निश्चित फायदा हर्षवर्धन पाटील यांना होणार असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गतवर्षीच्या चुका सुधारून नवीन जुन्याचा मेळ घातला. या भागात जरांगे फॅक्टर ही चालल्याची चर्चा आहे,त्यामुळे या गटातून महाविकास आघाडीचे हर्षवर्धन पाटील २ हजार मताचे मताधिक्य घेतील अशी शक्यता आहे.

७) बावडा- लाखेवाडी

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा हक्काचा हा गट या गटात राष्ट्रवादीचे नेते आप्पासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केल्याचे दिसून आले, परंतु पाटील यांनी पक्षातील सहकारी सोडून गेले,कुटुंब फुटले, एकटा पडलो अशी भावनिक साद घातली, त्यामुळे नेते एकीकडे व मतदार पाटील यांच्या मागे असे चित्र या गटात निर्माण झाले. त्याचबरोबर प्रवीण माने यांनीही या गटात आपली सर्व ताकद पणाला लावली हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातील मतदार हा भरणे व माने यांच्यामध्ये विभागला गेला याचा फायदा पाटील यांना झाल्याचे दिसून येते.

एकूण परिस्थिती पाहता ६ ते ७ हजार मतांचे मताधिक्य हर्षवर्धन पाटील घेताना दिसतील असे बोलले जाते.

इंदापूर शहर..

इंदापूर शहरात मुस्लिम व दलित मतदारांनी हर्षवर्धन पाटील यांची तुतारी वाजवल्याची चर्चा आहे, जुन्या नव्यांचा मेळ घालत पाटील यांनी शहरात प्रचार यंत्रणा राबवली, पाटील यांच्यापासून दुरावलेले काही स्थानिक नेतेही निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत आले.

या उलट आमदार दत्तात्रय भरणे यांनी शहरात कोट्यावधी रुपयांची कामे करूनही पक्षांतर्गत वाद, हेवेदावे, मतदारांना बाहेर काढण्यासाठी ॲग्रेसिव्ह पणा यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट काही बुथवर कमी पडल्याची चर्चा इंदापुरात आहे.

हर्षवर्धन पाटील यांचे विरोधक हे भरणे व माने यांच्यात विभागले गेल्याने याचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना झाला. यामध्ये हर्षवर्धन पाटील हे ५०० ते १ हजार मताची आघाडी शहरातून घेतील अशी चर्चा आहे.

एकूण परिस्थिती पाहता इंदापूर तालुक्यातून हर्षवर्धन पाटील हे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हे अंदाज आहेत २३ नोव्हेंबर रोजी निकालानंतरच स्पष्टता येणार आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here